92975
आचार्य अत्रेंसारखे व्यक्तिमत्व होणे नाही
पी. एल. कदम ः सिंधुदुर्गनगरीत ‘आम्ही साहित्यप्रेमी’चा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, ते क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केले, एवढेच नव्हे तर ते शिखरावर पोहोचले. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, असे विचार निवृत्त नगररचनाकार व लेखक पुरुषोत्तम लाडू उर्फ पी. एल. कदम यांनी ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात मांडले.
ओरोस येथील ‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठातर्फे आयोजित ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आम्ही साहित्यप्रेमी’चे समन्वयक सतीश लळीत यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. आचार्य अत्रे यांची जयंती १३ ऑगस्टला झाली. त्यानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्व, चरित्र व साहित्य यावर चर्चा करण्यासाठी ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. या व्यासपीठाचा हा सातवा कार्यक्रम होता. रसिकांच्या गर्दीत झालेल्या या कार्यक्रमात ११ वक्त्यांनी सहभाग घेत आचार्य अत्रे यांचे चित्र उभे केले.
यावेळी श्री. कदम यांनी आचार्य अत्रे यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रांमध्ये आचार्य अत्रेंनी भरीव काम केले. यातल्या प्रत्येक क्षेत्रात ते उत्तुंग व्यक्तिमत्व झाले. सर्वच क्षेत्रात सहजपणे यशस्वी मुशाफिरी करणारा अवलिया म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे.’’
‘आचार्य अत्रे यांची नाटके’ विषयावर लेखिका डॉ. सई लळीत यांनी विवेचन केले. आचार्य अत्रे यांची लेखनप्रकृती जरी विनोदी असली तरी त्यांनी अत्यंत गंभीर नाटकेही लिहिली. मोरुची मावशी, भ्रमाचा भोपळा, कवडीचुंबक, ब्रह्मचारी अशी विनोदांवर आधारित नाटके लिहितानाच घराबाहेर, लग्नाची बेडी, उद्याचा संसार अशी गंभीर व समस्याप्रधान नाटकेही त्यांनी लिहिली, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांनी आचार्यांच्या विडंबन काव्याबाबत माहिती दिली. विडंबन, चेष्टा करूनही समोरच्याला न दुखवण्याचे कसब त्यांच्याजवळ होते, असे सांगत अत्रे यांच्या अनेक विडंबन कवितांची उदाहरणेही दिली.
----
कार्यक्रमासाठी ११ जणांचे योगदान
ॲड. सुधीर गोठणकर यांनी, ‘ब्रह्मचारी’ नाटकातील ‘यमुनाजळी खेळु खेळ कन्हैया’ हे नाट्यगीत सफाईदारपणे सादर केले. प्रिया आजगावकर, मेघना उपानेकर आणि सुस्मिता राणे यांनी ‘पाणिग्रहण’ नाटकातील ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे नाट्यगीत वेगवेगळ्या ढंगात सादर केले. अपर्णा जोशी यांनी ‘भरजरी पितांबर दिला फाडून’ हे गीत सादर केले. नम्रता रासम यांनी अत्रे यांचे विनोद सांगितले. सतीश लळीत यांनी आचार्यांचे अनेक किस्से सांगितले. नेत्रा दळवी यांनी ‘छडी लागे छमछम’ कविता सादर केली. प्रगती पाताडे यांनी ‘प्रेमाचा गुलकंद’ ही कविता सादर केली. अशा प्रकारे ११ जणांच्या योगदानातून साकारलेला हा कार्यक्रम सुमारे दोन तास रंगला. याआधी दत्तराज सोसायटीचे रहिवासी स्वानंद वाळके यांचे वडील (कै.) सुरेश वाळके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.