rat22p9.jpg-
93192, 93310
सुवर्णपदक विजेता विनय कुलाबकर.
-------------
उटंबरच्या तरुणाची आंतरराष्ट्रीय भरारी
वॉटरस्पोर्ट्स; विनय कुलाबकरला सुवर्णासह दोन कांस्यपदके
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २२ : तालुक्यातील उटंबर कोळीवाडा येथील सोळा वर्षीय विनय कुलाबकर याने आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला आहे. ‘विन्ड सर्फिंग आयक्यू फॉईल’ या अद्वितीय वॉटरस्पोर्ट्स प्रकारात त्याने परदेशी स्पर्धांमध्ये चमकदार यश मिळवत दापोलीची, जिल्ह्याची आणि राज्याची मान उंचावली आहे.
काहीच महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या खेळात विनयने अल्पावधीत केलेली प्रगती उल्लेखनीय ठरली आहे. मलेशियामध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले तर सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत दोन कांस्यपदकांची कमाई केली. या कामगिरीच्या जोरावर तो २०२६ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरला आहे. या प्रकारात जिल्हास्तरावर आंतरराष्ट्रीय पातळी गाठणारा तो एकमेव खेळाडू आहे.
विनयने प्राथमिक ते नववीपर्यंतचे शिक्षण केळशीतील दांडेकर विद्यालयात घेतले. भविष्यात नौदलात प्रवेश करण्याची तीव्र इच्छा असल्याने दीड महिन्यानंतरच त्याने शाळेतून नाव काढून गोव्यातील मांडवी येथील नेव्ही युथ स्पोर्ट्स कंपनीत प्रवेश घेतला. केवळ एका वर्षाच्या कालावधीत त्याने या खेळाचे बारकावे आत्मसात करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे.
चौकट
खेळाबाबत थोडेसे
विन्ड सर्फिंग आयक्यू फॉईल हा खेळ अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. विशिष्ट पद्धतीने उभारलेल्या शिडावर, प्रबळ समुद्रीवाऱ्याच्या वेगासह समुद्रातील लाटांना छेद देत पुढे जाण्याची ही कला आहे. यात कोणतेही यांत्रिक साधन वापरले जात नाही तर केवळ खेळाडूच्या संतुलन, तोल आणि कसबावरच यश अवलंबून असते. या सर्वांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी विनयने प्रचंड परिश्रम घेतले. त्याच्या या मेहनतीला प्रशिक्षक प्रकाश अलेक्झांडर यांनी योग्य दिशा दिली.
----------
चौकट
तीन महिन्यात होणार तीन ट्रायल
उटंबरसारख्या छोट्या गावातून निघालेला हा तरुण आज आंतरराष्ट्रीय रंगमंचावर झळकत आहे. मलेशिया आणि सिंगापूरच्या समुद्रात समुद्रीलाटांवर कौशल्य दाखवत सुवर्ण आणि कास्यपदक जिंकणाऱ्या विनयच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिंगापूर येथील १०, ११ सप्टेंबरला झालेल्या स्पर्धेत कास्यपदक मिळाले. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी २०२६ या महिन्यात तीन ट्रायल होणार आहेत. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. विनयला याकरिता त्याचे प्रशिक्षक हेमंत पोफोला यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
कोट
मी माझं शिक्षण करून या खेळामध्ये भाग घेतला आहे. सध्या मी अकरावीत शिकत आहे. मलेशियातील स्पर्धेत सुवर्णपदक तर सिंगापूरच्या स्पर्धेत एक खुला गट तर दुसरे १८ वर्षाखालील स्पर्धेत कास्यपदक पटकावली आहेत. आता माझे लक्ष नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेवर आहे. त्यासाठी मी कठोर परिश्रम घेत आहे.
- विनय कुलाबकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.