swt2237.jpg
93395
मालवणः स्वराज्य ढोल-ताशा पथकाने महिलांच्या सन्मानावर जनजागृती केली
महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान
मालवणात जनजागृतीः स्वराज्य ढोल-ताशा पथकाकडून सामाजिक संदेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : शहरातील बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाच्या दुर्गादेवीचे आगमन यंदा एक वेगळाच संदेश घेऊन आले. ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ या विशेष थीम अंतर्गत आयोजित केलेल्या या सोहळ्याने केवळ धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले नाही, तर समाजाला एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला. स्वराज्य ढोल-ताशा पथकाने आपल्या दमदार वादनासह महिलांच्या सन्मानावर आधारित फलकांद्वारे प्रभावी जनजागृती केली.
शहरातील वायरी ते भरड मार्गे बाजारपेठ ते बांगीवाडा असा ढोल-ताशांच्या गजरात दुर्गादेवीचा आगमन सोहळा पार पडला. यावेळी स्वराज्य ढोल-ताशा पथकातील पुरुष व महिला सदस्यांनी ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ ही थीम प्रत्यक्षात आणत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या वादनासह या पथकातील सदस्यांनी हातात घेतलेल्या फलकांनी या सोहळ्याला एक सामाजिक रूप दिले.
या फलकांवर ‘एक वेळ नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील, पण स्त्रीचा आदर नक्की करा,’ ‘स्त्री जर ढोल ठोकू शकते तर वेळ आल्यावर नराधमालाही ठोकू शकते,’ ‘महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान,’ ‘वरवरचा दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा’ आणि ‘मूर्तीतील देवीसोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा’ अशा आशयाचे प्रभावी संदेश होते. या अनोख्या उपक्रमाने शहरवासीयांना आकर्षित केले आणि त्यातून एक सकारात्मक विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्वराज्य ढोल-ताशा पथकाचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम शहरवासीयांसाठी लक्षवेधी ठरला. या उपक्रमात शिल्पा खोत, माजी नगरसेवक यतीन खोत तसेच शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे आणि स्वराज्य ढोल-ताशा पथकाचे मालवण व आचरा येथील महिला सदस्य, बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.