वाचनालयातील गमतीजमती------लोगो
(नवीन सदर आहे)
पुस्तकांनाही मन असतं. ते आपल्या भावना एकमेकांकडे व्यक्त करतात. त्यांना येणारे अनुभव चांगले कसे असतील यासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. पुस्तकं जपून हाताळा.. त्यांची पानं दुमडू नका.. पावसात पुस्तकं भिजणार नाही याची काळजी घ्या हे सांगायची वेळ कोणाही ग्रंथालय सेवकावर येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
- rat२३p५.jpg-
25N93506
मिनल मनोज हळदणकर
ग्रंथपाल,
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय.
---
पुस्तकं कुजबुजतात...
एका शांत दुपारी वाचनालयात काम करत बसले होते. पाठीमागच्या भिंतीपलीकडून पुस्तकांच्या रॅकमध्ये जरा कुजबुज ऐकू आली. या वेळी तिकडे कोण बरं.. मी कानोसा घेतला... थोडं डोकावलं.. कोणीच तर नाहीय.. मग हा आवाज कोणाचा.. आणखी कान ताणले आणि ऐकू लागले...!
‘काय रे ?..तुझी ही अशी अवस्था कशाने झाली? तुला खूप दुखतंय का? आजच आलास ना बाहेरुन..? फारच थकलेला दिसतोयस!’ जरासं दुखऱ्या आवाजात उत्तर आलं.. ‘हो ना.. अंग अगदी मोडून गेलंय.. गेला आठवडाभर मी काय काय सहन केलं काय सांगू. त्या दिवशी एक आजोबा मला वाचायला घेऊन गेले. मला छानपैकी टेबलवर ठेवलं आणि ते मित्राबरोबर गप्पा मारायला निघून गेले. तेव्हड्यात त्यांचे दोन द्वाड नातू आले. एकाच्या हातात जाड पुठ्याची वही होती. तो दुसऱ्याला गमती गमतीत मारत होता आणि मी समोरच होतो. दुसऱ्याने मला उचललं आणि जाड पुठ्याच्या वहीबरोबर माझी लढाई लावली. सगळीकडून मार खाल्ला रे.. खूप दुखतंय.’ आता संवादात नवीन आवाज सामील झाला.. मी बघितलं तुला त्या आजोबांबरोबर जाताना. त्यांच्या घरातला हा अनुभव एकदा मी सुद्धा घेतला आहे. पण इतर घरात असं नसतं बरं का.. एकदा तर एक काका मला त्यांच्या पुस्तकांबरोबर घेऊन गेले होते. तिथे त्यांची मुलगी अभ्यास करत बसली होती. अभ्यास झाल्यावर तिने मला संपूर्ण वाचून काढलं. माझ्यातल्या गोष्टीनी ती खूश झाली. ते पाहून मलाही आनंद झाला. असे वाचक भेटले की आनंद होतो.’ आता आणखी आवाज संवादात सामील होऊ लागले.. ‘एकदा तर मी बाहेरच्या रॅकमध्ये बसून वाचकांची वाट बघत होते. एका आजीने मला उचलून घेतलं.. आणि ती हरखून गेली. म्हणाली हेच कवितेचं पुस्तक हवं होतं मला. अगदी ग्रंथालयात आल्याआल्या समोर मिळालं. बरं झालं बाई.. असं म्हणून मला ती कौतुकाने घरी घेऊन गेली. छान जपून वाचलं हो मला.. अगदी काळजीपूर्वक! एकदम रिच फील आला मला.’
हा संवाद सुरू असताना त्याच्याही पलीकडच्या रॅकमधून उसासा सोडल्याचा आवाज आला. संदर्भ ग्रंथांचा रॅक होता तो. एक संदर्भ ग्रंथ गंभीर आवाजात म्हणाला.. ‘तुम्ही सगळे बाहेर जाता. फिरून येता.. आणि इथे गडबड करत बसता.. मला नाही आवडत अशा चर्चाबिर्चा करायला. मला भेटायला येणारे वाचक हे किती प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे असतात. ते अजिबात गडबड गोंधळ करत नाही. माझ्यातला संदर्भ शोधून झाला की ते शांतपणे मला माझ्या जागेवर परत आणून सोडतात. मला ही शांतताच भावते. नाहीतर त्या तिथे असलेला बालविभाग.. जरा शांत बसत नाही. त्या मुलांबरोबर फिरून फिरून त्यांच्यातला पोरकटपणा जागा झाला आहे जणू !’ हे ऐकून बालविभागात खुसखुस ऐकू आली. काही जण फिदिफिदि हसली.
हळूहळू इतर पुस्तकंही संवादात सामील होऊ लागली. बाजूच्याच गठ्ठ्यातल्या पुस्तकानं अगदी मोकळ्या आवाजात आपला अनुभव सांगायला सुरुवात केली. ते म्हणालं. ‘कोश भाऊ, तुम्ही रहा गंभीर.. पण खरं सांगू का.. आमच्या सारखे आम्हीच! आम्हाला जे घेऊन जातात.. ते आमच्या लेखकावर मनापासून प्रेम करणारे असतात. आम्हाला संपूर्ण वाचून एका दिवसात परत आणतात. त्यामुळे कितीतरी घरांमध्ये आम्ही जाऊन आलो आहे. आम्हाला वाचून अनेकजण आपापसात स्टोरी शेअर करतात. खूप मजा येते. आमचे लेखक जरी गेले असले तरी त्यांचे चाहते खूप आहेत. त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे वाचक वाढतच आहे.. म्हणून आम्ही सदा खूशच असतो.’ हळू हळू आवाज वाढू लागले. आणि तेवढ्यात कोणा वाचकाची चाहूल लागली आणि परत सगळे चिडिचूप झाले.. एकदम शांतता पसरली. पुस्तकांनाही मन असतं. चला तर मग पुस्तकं जपून हाताळूया.. त्यांची जपणूक करुया!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.