दिव्यांग बालकांसाठी
मळगावमध्ये शिबिर
ओरोसः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या शाळा व सर्व अशासकीय संस्था यांच्यामार्फत दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी करण्यासाठी शनिवारी (ता. २७) सकाळी १० वाजता सावंतवाडी तालुक्यातील भगवती सभागृह, मळगाव येथे (रेल्वे स्टेशन रोड) शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये दिव्यांग बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना शासकीय योजनांची माहिती व लाभ, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय तपासणी, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, नवीन आधार कार्ड व अद्ययावत करणे तसेच दिव्यांग बालकांसोबत उपस्थित राहणारे शिक्षक व पालक यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त दिव्यांग बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी तसेच तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ व दोडामार्ग या कार्यालयांशी संपर्क साधा किंवा ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
.....................
मेढ्यात शुक्रवारी
ललिता पंचमी
मालवणः मेढा येथील श्री काळबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रोज सायंकाळी ७.३० वाजता महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी ४ वाजता ललिता पंचमीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ, मेढा-मालवण यांनी केले आहे.
.......................
आडेली येथे धार्मिक,
सांस्कृतिक कार्यक्रम
सावंतवाडीः आडेली (ता. वेंगुर्ले) येथील सोमेश्वर सातेरी पंचायतन मंदिरात नवरात्रोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्री उत्सव प्रारंभीपासून ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी देवतांची विधीवत पूजा व माळेचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ग्रामस्थांची भजने व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच ३ ऑक्टोबरला दसरा उत्सव व रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
........................
शिरोडा वेळागर
किनारी स्वच्छता
आरोंदाः आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या निमित्ताने शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने वेळागर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळपासून या मोहिमेस सुरुवात झाली. या मोहिमेत शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे यांनी सहभाग घेतला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदांडा) सदस्यांचाही मोहिमेत सहभाग होता. पूर्ण प्राथमिक शाळा खर्डेवाडीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक पथनाट्य सादर केले. स्वच्छतेची माहिती आणि संदेश सादर केला. सरपंच रेडकर आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे यांनी सहभागींचे आभार मानले.
........................
चित्रकला स्पर्धेस
वेंगुर्लेत प्रतिसाद
वेंगुर्लेः स्वच्छता ही सेवा पंधरवडानिमित्त येथील नगरपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छ चित्रकला’ स्पर्धा घेण्यात आली. यात पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी अशा दोन गटांतील सर्व शाळांमधून एकूण ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. चित्रकला स्पर्धेसाठी ‘माझी स्वच्छ शाळा’, ‘प्लास्टिकमुक्त शहर’, ‘स्वच्छ समुद्रकिनारा’, ‘स्वच्छतेचा बालमहोत्सव’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आदी विषय होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून स्वच्छतेचे विविध संदेश रंगांच्या माध्यमातून रेखाटले. यासोबतच त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करणे तसेच स्वच्छतेविषयीचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविणे, हा चित्रकला स्पर्धा आयोजनाचा हेतू असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी सांगितले.
.......................
भंडारी पतसंस्थेचे
वायंगणकर अध्यक्ष
वेंगुर्लेः भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे संचालक जयराम वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी सहकारी पतसंस्था अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ तालुका सरचिटणीस डॉ. आनंद बांदेकर, उपाध्यक्ष अंकिता बांदेकर, रमेश नार्वेकर, प्रकाश गडेकर, नीलेश चमणकर, श्रीकृष्ण पेडणेकर, नंदन वेंगुर्लेकर, दीपक पडवळ, पतसंस्था सचिव अनिता रेडकर आदी उपस्थित होते. रमण वायंगणकर यांनी, पतसंस्थेला उर्जितावस्था आणण्यासाठी सर्व संचालकांनी एकत्रित काम करावे, हेवेदावे बाजूला ठेवून पतसंस्थेला आपला वेळ देत संस्थेचा विस्तार करावा व तालुक्यातील एक अग्रणी पतसंस्था म्हणून नावारुपाला आणावी, असे आवाहन केले. तालुका सरचिटणीस डॉ. आनंद बांदेकर यांनी वायंगणकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे अभिनंदन केले.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.