swt2332.jpg
93736
एकनाथ नाडकर्णी
दीपक केसरकर यांच्या घोषणा फसव्या
एकनाथ नाडकर्णीः जनतेचा विश्वास उरलेला नाही
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २४ः तालुक्यातील सर्व हत्ती ‘वनतारा’मध्ये पाठविणार अशी वल्गना करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्यावर आता येथील जनतेचा विश्वास उरलेला नाही. हत्ती पकड मोहीम राबविणार, हत्तीपासून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार अशी अनेक आश्वासने केसरकर यांनी यापूर्वी दिली आहेत. मात्र, आतापर्यंत किती पूर्ण झालीत हे सर्व जनतेला माहितीच आहे. त्यामुळे केसरकर यांच्या घोषणांवर आता विश्वास राहिलेला नाही, अशी टीका भाजपचे पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी यांनी केली.
श्री. नाडकर्णी म्हणाले, ‘‘केसरकर यांना आतापर्यंत तीन वेळा तालुक्यातील जनतेने भरघोस मते घातली आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी हत्ती प्रश्न निकाली काढला जाईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्याकडून एकदाही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. शिवाय त्यांनी यापूर्वीही अनेक विकास कामांची आश्वासने दिली आहेत. तिलारी धरण परिसराचा विकास होणार, त्याठिकाणी अम्युझमेंट पार्क उभारले जाईल, चष्म्याचा कारखाना आणला जाणार, आडाळी एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग उभारले जातील अशी नानाप्रकारची आश्वासने त्यांनी दिली होती. मात्र, ती सर्व फोल ठरली आहेत. त्यामुळे त्यांनी हत्ती पकड मोहीम राबविली जाईल, असे सांगून आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नये.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी हे आपण शेतकरी आहे, अशी वल्गना नेहमी करत असतात. पण, त्यांना शेतकऱ्यांचे काहीही सोयर सुतक नाही. तेही याआधी खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांच्यासोबतच तालुक्यात काम करत होते. त्यावेळीही अशाच प्रकारे हत्ती प्रश्न गंभीर होता. त्यावेळी त्यांना कधी हत्ती प्रश्नांवर बोलावे काहीतरी करावे, असे वाटले नाही. फक्त पक्षाकडून कार्यक्रम आला आहे म्हणून ते बेताल वक्तवे करत फिरत असतात. एकतर त्यांच्यासोबत आता कार्यकर्तेही दिसत नाहीत आणि स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून वाट्टेल ते बोलत फिरत असतात. त्यामुळे त्यांनीही यापुढे पालकमंत्री नितेश राणे यांचे काम पहावे आणि नंतरच बोलावे. धुरी यांनी आपल्या भिकेकोनाळ या गावी गायी पाळल्या आहेत हे अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. पण, त्यांना चरण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये सोडून घालत असल्यामुळे काहींचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांनी हत्तींवर लक्ष न देता आपल्या गायींवर लक्ष द्यावे.’’
चौकट
पालकमंत्री ‘हत्ती पकड’ राबविणार
येणाऱ्या काळात हत्ती पकड मोहीम राबवू, असा शब्द पालकमंत्री राणे यांनी दिला आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात श्री. राणे लवकरच ती पूर्ण करतील आणि जनतेचाही पूर्ण विश्वास पालकमंत्र्यांवर आहे, असेही नाडकर्णी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.