‘स्वच्छोत्सव’ अंतर्गत आज
‘महास्वच्छता अभियान’
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून उद्या (ता. २५) सकाळी ८ ते ११ या वेळेत ‘महास्वच्छता अभियान’ राबविण्यात येणार आहे.
‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेवर आधारित या देशव्यापी श्रमदान उपक्रमात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे. यावर्षी ‘स्वच्छता ही सेवा’साठी ‘स्वच्छोत्सव’ ही थीम निश्चित केली आहे. मोहिमेअंतर्गत तालुका व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचे उपक्रम सुरू असून, अस्वच्छ ठिकाणांची निवड करून त्यांची मॅपिंग व साफसफाई करण्यात येत आहे.
याअंतर्गत उद्या आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला बचतगट, युवक, शासकीय कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. यावेळी गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महास्वच्छता अभियानाची प्रभावी प्रसिद्धी व जनजागृती होण्यासाठी गावपातळीवर व्हॉट्सअॅप ग्रुप, दवंडी, नोटीस तसेच सार्वजनिक ठिकाणी फलक लावावेत. जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग मिळविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करावे, असेही आवाहन खेबुडकर यांनी केले आहे.