प्रवेशाच्या विलंबाने समर्थकांत अस्वस्थता
वैभव खेडेकरांपुढे आव्हान; कार्यकर्ते अन्यत्र वळण्याची शक्यता
सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : कोकणात मनसेचे इंजिन सुसाट नेणाऱ्या वैभव खेडेकर यांचा भाजपमधील प्रवेश रखडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. खेडेकर यांच्यापुढे समर्थकांची मोट प्रवेश होईपर्यंत अशीच बांधून ठेवावी लागणार आहे; मात्र मनसेतून बाहेर पडण्याच्या इच्छेत असलेले कार्यकर्ते भाजपपेक्षा अन्य पक्षांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने ग्रामीण भागासह शहरातील पाळेमुळे भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. २०१४ पासून पक्षीय बळ वाढवण्यासाठी ऑपरेशन कमळ सुरू झाले. राज्यातील हा फॉर्म्युला कोकणातही दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपही भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामीण भागात यश मिळवण्यासाठी चांगले पदाधिकारी पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत यादव भाजपत आले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभव खेडेकर यांच्या प्रवेशासाठी डाव टाकलेला होता. खेडेकर यांना मनसेने पक्षातून बडतर्फ केले आहे. त्यानंतर कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांची भेट घेऊन खेडेकर यांनी भाजपत येणार असल्याचे जाहीर केले; परंतु दोनवेळा तारखा देऊनही खेडेकर यांचा प्रवेश रखडला आहे. हा पक्षप्रवेश रखडण्यामागे नक्की कोण आहे याबाबत तर्कवितर्क बांधले जात आहेत.
एका प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वाच्या हट्टापोटी हे राजकारण रंगल्याचा तर्क काढला गेला आहे. हा प्रवेश रखडल्यामुळे खेडेकर यांच्याबरोबर असलेली कार्यकर्त्यांची फळी विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे तसेच पक्षात येत असलेल्या चांगल्या कार्यकर्त्याला अशी वागणूक मिळणे अनपेक्षित असल्याचे भाजपश्रेष्ठींकडून बोलले जात आहे.
आगामी काळात मुंबई महापालिकेसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून, त्या वेळी प्रादेशिक पक्षांकडून मदत मिळवण्याची खेळी प्रवेश रखडण्यामागे असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे तसेच खेडेकर यांच्या प्रवेशामुळे कोकणातील इंजिन घसरणार आहे. रखडलेल्या प्रवेशामुळे खेडेकरांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत आहे.
कोट
वैभव खेडेकर हे तरुण नेतृत्व आहे. पक्षवाढीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी खेडेकर यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची पक्षाला गरज आहे.
- विनोद चाळके, तालुकाध्यक्ष दक्षिण खेड, भाजप
----
कोट
माझा पक्षप्रवेश रोखून मला संपवू पाहणाऱ्यांना मी काही न बोलता उत्तर दिलेले आहे. पक्षप्रवेश ही केवळ औपचारिकता आहे. मंत्री नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत माझा भाजप प्रवेश जाहीर केल्यानंतर मी भाजप पक्षाचे काम सुरू केलेले आहे. माझे सर्व जुने सहकारी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहेतच; परंतु भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या संपर्कात असल्याने मी अधिक जोमाने यापुढे भाजप पक्षाचे काम करेन.
- वैभव खेडेकर, खेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.