-rat25p30.jpg-
25N94177
चिपळूण ः सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील बाजी नावाचा वाघ.
---------
सेनापती, सुभेदार, बाजी नावाने वाघांची ओळख
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा पुढाकार ; संवर्धनाबरोबरच लोकसहभाग
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना ‘सेनापती’, ‘सुभेदार’ व ‘बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिक लोकांमध्ये वाघांबाबत असलेली आत्मीयता स्पष्ट होते. संवर्धनाबरोबरच त्यातील लोकसहभागही वाढतो आहे.
‘सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात’ अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध किताबांचा आधार घेण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्रप्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत; मात्र पर्यटकांमध्ये वाघाविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वनविभागाने स्वीकारले आहे.
सध्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात तीन नर वाघ आहेत. 2018 नंतर पाच वर्षांनी 2023 मध्ये 17 डिसेंबरला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघाची नोंद झाली. त्या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक एस. टी. आर. टी १ असा देण्यात आला. कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात 23 एप्रिल 2022 रोजी सर्वप्रथम टिपलेला आणि 13 एप्रिल 2024 रोजी त्याच ठिकाणी राहिलेला नर वाघ हा 100 किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात 28 ऑक्टोबर 2024 रोजी टिपला गेला. त्याचा सांकेतिक क्रमांक एस. टी. आर. टी २ असा ठेवण्यात आला. पुढे 2023 ला कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ 2025 रोजी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आल्याने त्याला एस. टी. आर. टी ३ असा सांकेतिक क्रमांक दिला आहे. हाच वाघ कोकणातून चिपळूण वनपरिक्षेत्रातही जाऊन आला होता. सध्या एस. टी. आर. टी १, एस. टी. आर. टी २ हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असून, एस. टी. आर. टी ३ हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे.
स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी एस. टी. आर. टी १ या वाघाला सेनापती तर एस. टी. आर. टी २ या वाघाला सुभेदार आणि एस. टी. आर. टी ३ या वाघाला बाजी असे नाव दिले आहे. व्याघ्रप्रकल्प झाल्यानंतर एस. टी. आर. टी १ हा सर्वप्रथम दिसला. लढाईमध्ये ज्याप्रमाणे सेनापती सर्वप्रथम येतो त्यावरून या वाघाला हे नाव दिले आहे.
कोट
सह्याद्री व्याघ्र राखीवातील वाघांना स्थानिक लोकांनीच लोकप्रिय नावे दिली आहेत. त्यामुळे वाघांबाबत जनजागृती वाढते आणि संवर्धनाच्या कामाला नवी गती मिळते. ‘सेनापती’, ‘सुभेदार’ आणि ‘बाजी’ ही नावे सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाची व परंपरेची आठवण करून देणारी आहेत.
– तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्रप्रकल्प, कोल्हापूर.
----
कोट
सध्या ऑपरेशन ‘तारा’ या विशेष उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प येथून वाघीण सह्याद्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल.
– किरण जगताप, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्रप्रकल्प, कोयना.
------
कोट
वाघांना लोकांनीच नावे देणे, हा सामाजिक सहभागाचा एक प्रकार आहे. त्यामुळे वाघांबाबत आपुलकी वाढते, सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील हा संगम भावी काळात संवर्धन, पर्यटन आणि जनजागृती या सर्वचदृष्टींनी महत्त्वाचा ठरणार आहे.
- रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.