बोल बळीराजाचे----------लोगो
(२० सप्टेंबर टुडे ३ )
माझ्या बळीराजानं बागांच्या देखभालीच्या खर्चाचं नियोजन उत्पादनावर अवलंबून न ठेवता अन्य मार्ग शोधायला हवे. ज्यानं मिळणारं उत्पादन जेव्हा मिळेल तेव्हा ते मोठ्या, दीर्घकालीन सुधारणांकडे वळवता येईल. बागेत ठराविक ठिकाणी तरी पाण्याचं नियोजन, अंतर्गत रस्ते, शेतघर-संडास, बाथरूम, विजेची व्यवस्था यासारख्या गोष्टी आता अत्यावश्यक आहेत. त्यासाठी खर्च करताना या निधीचा, शिलकीचा उपयोग होईल. ही फळांच उत्पादन, उत्पन्न देणारी झाडं असली तरी साफसफाई करताना राखून ठेवलेली वनसंपदा आपला देखभालीचा खर्च उचलायला नक्कीच समर्थ असतात. फक्त दृष्टिकोन सरसकट सफाई म्हणजे फळझाड सोडून सगळं तोडूनच नाही तर मुळासकट उखडून टाकायचा नसावा.
- rat२६p३.jpg-
25N94401
- जयंत फडके,
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
-----
देखभाल खर्चाचं नियोजन हवं अन्य मार्गातून
लवकर सुरू झालेला पाऊस यावर्षी लवकर माघारी फिरेल, असा अंदाज सर्वसाधारणपणे होता; पण नवरात्रोत्सव आला तरी अजून माघारीचा विश्वास वाटत नाहीये. भातकापणीला आलंय; पण माझा बळीराजा बागासफाईतच आहे. आंबा, काजू, नारळ मिळो अगर न मिळो; पण साफसफाई, देखभालीची कामं चुकत नाहीत. आंबा तर लहरी राजा, त्यात बदलता निसर्ग त्याला अधिकच बदनाम करतोय; पण साफसफाई, खते, बांडगुळं काढणे, मर काढणे, मूळ कुजवा, खोडकिड्यावर लक्ष ठेवून उपाययोजना करणे ही कामं आंबा येवो न येवो बागायतदाराला चुकत नाहीत .काजूच्या बागांची साफसफाई, खोडकिड्याचा बंदोबस्त, खतं व्यवस्थापन करून केव्हा मोहोर येईल तेव्हा हवामान पोषक नसलं तर करपलाच समजायचा तो..; पण म्हणून ही कामं कशी टाळणार? माडांवर नारळ असणं, हे आता लाल तोंडाच्या माकडांच्या मर्जीवर आहे; पण म्हणून साफसफाई, पाणी व्यवस्थापन, शेण, रासायनिक खत, माडांचा शेंडा/कवळसफाई काय माकडं करणार आहेत? त्यांना आवडलं नाही शहाळं तर खाली टाकायला तयार.. मग बागायतदारांना आंबे, काजू, नारळ काढण्यापलीकडे काय काम? असं उथळ बोलणाऱ्या शहरी बाबूंना ही देखभालीची कामं कशी कळणार..? आंब्याचा, काजूचा, नारळाचा वाढलेला दर सगळ्यांनाच दिसतो; पण वाढती मजुरी, मजुरांची अनुपलब्धता, घटतं उत्पादन हेही कधीतरी समजून घ्यायला हवं.
फळबागात कोकणात किंजळ, ऐन, सागवान,धामण, हसाणी, हेला, हषा, पळस, सालदोर, कुंभ्या अशी शेकडो झाडे नैसर्गिकरित्या उगवतात. पावसाच्या पाण्यावर वाढतात. त्यांना लावायला, जगवायला नकोय फक्त मारलं नाही तरी पुरेसं आहे. त्यांचा दुहेरी फायदा असा की, अनेक कीटक त्यांचं जीवनचक्रच त्यावर पूर्ण करतात. मुख्य फळझाडाला या कीटकांचा त्यामुळे त्रास कमी होतो. फक्त मुख्य फळझाडाला त्रास होणार नाही अशा ठिकाणचीच वनसंपदा राखून ठेवली की झालं. दुसरा आणि महत्वाचा फायदा असा की, यापासून मिळणारं लाकूड इमारती, फर्निचर वापरासाठी उपयोगी येतं त्याचबरोबर इंधन म्हणूनही उपयोगी पडतं. कंपाऊंडला, वहाळांच्या कडेला मुद्दाम लावलेला बांबू चार पैसे प्रतिवर्षी मिळवून देतो तर काही वृक्ष चांगले जून झाले की, किमती लाकूड म्हणून फर्निचरसाठी वापरात येतात, चांगले पैसे मिळवून देतात. चिरफळं, वावडिंग, बिब्बा, हरडा, बेहडा हे औषधी उपयोगाच्या उत्पादनातून चार पैसे देतात तर दशपर्णी अर्कासाठी आवश्यक वनस्पती राखून ठेवल्या तर आपल्या फळझाडांच्या कीडरोगापासून संरक्षणात सहाय्यक होतात. फळझाडांना यावर्षी लावलेले जंगली झाडांचे आधार पुढच्या वर्षी जळावू लाकूड म्हणून वापरात येतात.
कोकणातील बागायतदारांच्या बाबतीत शहरी समाजाचे अनेक गोड गैरसमज आहेत. फेब्रुवारीत पहिल्या जाणाऱ्या चार डझनाना दहा हजार मिळत असले तरी ते एक-दोन टक्केच असतात. खरे आंबे जेव्हा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजारात येतात तेव्हा आवक आवाक्याबाहेर गेल्याचे दलालांच्या विक्रीपट्ट्या डोळ्यातून पाणी काढतात. दहा हजाराच्या आशेवर स्वार होऊन नवनवीन फंडे लढवले जातात. पिककर्जांचे आकडे फुगतात; पण जून महिन्यात दिसणारी तोटापट्टी कोणत्याच चॅनेलवर दाखवली जात नाही. माझा स्वाभिमानी बळीराजा बॅकांचे पैसे वाट्टेल त्या मार्गाने पूर्ण करतो. शिल्लक ठेवायला त्याच्याजवळ खिसाच नसतो. तो आत्महत्या करत नाही, नेटाने लढतो. लहान लहान मार्गांनी दोन पैशांची बचत झाली तर तोच तोट्यातला फायदा ठरतो. खर्च कधीच कमी होणार नाहीत. उत्पन्नाचे मार्ग माझ्या बळीराजानेच शोधायला हवे.
(लेखक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.