असुर्डेत बिबट्याचा अपघात, भीतीचे वातावरण
मादी बिबट्याच्या फेऱ्या ; वनविभागाकडून उपाययोजनेची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः असुर्डे येथील पुलाजवळ बिबट्याच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाल्यानंतर त्या परिसरात मादीचे वास्तव्य वाढले आहे. घटना घडल्यानंतर सलग दोनवेळा मादी तिथे येऊन गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते; परंतु वनविभागाने त्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसला नाही. त्यामुळे सध्यातरी त्या परिसरातून प्रवास करणे धोकादायक नाही.
तालुक्यातील असुर्डे पुलाजवळ सोमवारी (ता. २२) बिबट्याच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी (ता. २३) रात्री बिबट्या मादीने मृत पिल्लाला पाहण्यासाठी पुन्हा घटनास्थळी हजेरी लावली. बिबट्या मृत पावण्याची ही या परिसरातील तीन वर्षांतील तिसरी घटना आहे. त्या भागात पाणवठा असल्यामुळे बिबट्यासह अन्य वन्यप्राणी नियमितपणे ये-जा करत असतात; मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस ही परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. या प्रकारांवर वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. बिबट्या मादीचे मृत पिल्लाला शोधत घटनास्थळी येणे, हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या अनेकांची मने हेलावून टाकणारे होते. असुर्डे येथे बिबट्या मादी पिल्लाला पाहण्यासाठी आल्याचे रिक्षाचालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्यामुळे त्या रस्त्याने जाण्यास पादचारी तसेच वाहनचालकही घाबरत आहेत. वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात; मात्र प्रत्यक्षात त्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जात नाहीत.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी पावस परिसरात आक्रमक झालेल्या एका बिबट्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार घडण्यामागील काही कारणे सांगण्यात आली होती. त्यात संबंधित बिबट्याचा वाहनांकडून अपघात झाला असावा, असा अंदाज बांधला होता. याच प्रकाराची पुनरावृत्ती असुर्डे येथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी वनविभागाकडून त्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट
वनविभागाने हे उपाय करावेत
वन्यप्राण्यांचा वावर अधिक असलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी वाहनांच्या वेगमर्यादा निश्चित करणे, वाहनांसाठी वन्यप्राणी चेतावणी फलक लावणे, तेथे अंडरपास किंवा ओव्हरपास तयार करणे, रात्रीच्या वेळेस वाहतूक मर्यादा लादणे आवश्यक आहे.
----
कोट
असुर्डे येथे घटना घडल्यानंतर वनविभागाने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यामध्ये बिबट्या दिसलेला नाही. कदाचित बिबट्या त्या परिसरातून निघून गेल्याची शक्यता आहे.
- प्रकाश सुतार, प्रादेशिक परिवहन अधिकारी