-rat26p33.jpg-
P25N94579
राजापूर ः पेंडखळे येथे रस्त्याच्या सफाईमध्ये ग्रामस्थ, भाजप कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झालेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुकाध्यक्ष मोहन घुमे.
पेंडखळेत श्रमदानातून साफसफाई
बिबट्याच्या दर्शनानंतर गती ; शाळकरी मुलांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः तालुक्याच्या विविध भागामध्ये बिबट्याच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मुक्त संचाराने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पेंडखळे येथील चिपटेवाडी ते चिपटेवाडी फाटा (चव्हाण घर) परिसरात दुचाकीवर तीन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना सुमारे दहा दिवसांपूर्वी घडली होती. ज्या भागातील जंगलझाडीमध्ये राहून बिबट्याने हल्ला केला होता त्या भागातील रस्त्यानजीकची धोकादायक झाडेझुडपे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी स्वखर्चाने सफाई करून या भागातील ग्रामस्थांसह शाळकरी मुलांना सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने दिलासा दिला.
गुरव यांनी राबवलेल्या उपक्रमामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, प्रकाश गोडेकर, मंदार सप्रे, कोतापूरचे बाळ घाटे, अक्षय पाध्ये, पांडुरंग सुर्वे, सुनील खानविलकर, संजू जोगळे, भरत गराटे, संदेश विचारे, दत्ताराम पुजारी, संदीप तेरवणकर आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तालुक्याच्या विविध भागांसह पेंडखळे परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू आहे. या भागामध्ये रस्त्याच्या दुतर्फा जंगलझाडी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या जंगलझाडीचा आसरा घेत बिबट्याला त्या परिसरामध्ये थांबणे अधिक सोयीचे ठरते. याच भागातून ग्रामस्थांसह शाळकरी मुले बिबट्याच्या हल्ल्यानंतरही सातत्याने भीतीच्या छायेखाली जा-ये करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गुरव यांनी धोकादायक ठरणारी स्वखर्चाने जंगलझाडी तोडून या भागातील सुमारे दोन किमी लांबीचा रस्त्यानजीकचा परिसर मोकळा केला आहे.