‘सेवा पंधरवडा’ आजपासून गतिमान
तिसरा टप्पा; जिल्हा प्रशासनातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः राज्याच्या वतीने सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत उद्यापासून (ता. २८) नावीन्यपूर्ण उपक्रम हा टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ‘शाळा तिथे दाखला’ हा उपक्रम आधीच सुरू केला असून, उद्यापासून हा उपक्रम अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीचे औचित्य साधत राज्याने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून जाहीर केला आहे. या अभियानाचे तीन टप्पे आहेत. यातील पाहिला टप्पा १७ ते २२ सप्टेंबर, तर दुसरा टप्पा २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आला असून, ‘सर्वांसाठी घरे’ यासाठी पूरक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. तिसरा टप्पा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविला जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीनुसार नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात राबविलेल्या पाणंद रस्ते मोहिमेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत रस्ता उपलब्ध करण्यासाठी शेतरस्त्यांची मागणी पूर्ण करणारी समग्र योजना राबविण्यात आली. तसेच विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. गाव नकाशात शेतरस्त्यांचा समावेश करण्याची कार्यवाही करण्यात आली. ग्रामीण रस्त्यांच्या सीमांकनाबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी केली गेली. शिवपाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण केले गेले. शासन दप्तरी नोंद न झालेल्या रस्त्यांची नोंद घेतली गेली. शेतरस्त्यांसाठी संमती पत्र घेतली गेली आहेत. शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन केले गेले.
दुसऱ्या टप्प्यात राबविलेल्या सर्वांसाठी घरे या मोहिमेत प्रत्येक नागरिकाला परवडणारे व सुरक्षित घर मिळावे, यासाठी शासकीय जमिनीचा कब्जा अधिकाराने वाटप करण्याची मोहीम राबविली गेली. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील २५ कातकरी कुटुंबांना प्रत्येकी एक गुंठा याप्रमाणे शासकीय जमीन नावे केल्याचा मालकी हक्क १७ सप्टेंबरला झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते देण्यात आला.
तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे शासनाचे आदेश आहेत. स्थानिक गरजा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना आहेत. यात स्थानिक ते संसदीय पातळीपर्यंत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तिसरा टप्पा उद्यापासून (ता. २८) सुरू होत आहे. या तिसऱ्या टप्प्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवडा उपक्रमाच्या सुरुवातीच्या आधीपासून प्रारंभ केला आहे. यामध्ये ‘शाळा तिथे दाखला’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिली ते दहावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या ९७ हजार विद्यार्थ्यांना जात, वय आणि अधिवास प्रमाणपत्र देण्याचा मानस जिल्हा प्रशासनाचा आहे. त्यानुसार जोरदार कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी शाळांना आदेश दिले असून शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कागदपत्रे संकलित केली जात आहेत.
....................
कोट
शाळा तिथे दाखला, रस्ते, पाणंद, सर्वांसाठी घरे यासाठी नियोजन केले आहे. पहिल्या दोन टप्प्यांत झालेल्या कामांचा आढावा घेतला जात आहे. ही माहिती संकलित झाल्यावर याबाबत स्पष्टता होणार आहे.
- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी