‘लाडकी बहीण’च्या
ई-केवायसीत अडचणी
कणकवली ः ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी शासनाने सर्वच बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर लाभार्थी स्वतः ईकेवायसी करू शकतात, असेही जाहीर केले आहे. मात्र, शासनाच्या या संकेतस्थळावर आजही ई-केवायसी होत नाही. या ठिकाणी ‘ओटीपी’ सेंट होत नसल्याने लाभार्थ्यांनी करायचे काय, असा प्रश्न केला जात आहे. राज्याने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करताना ही केवायसी घरबसल्याही करू शकता, असे जाहीर केले आहे. त्यासाठी संकेतस्थळही जाहीर केले आहे. ही केवायसी कशी करायची, याबाबत मार्गदर्शनपर माहितीही प्रसिद्ध केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी ही केवायसी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, आधारकार्ड नंबर व कॅप्चा (कोड नंबर) मारल्यानंतर पुढे ओटीपी सेंट होत नाही. सातत्याने प्रयत्न करूनही ‘एरर’ दाखविण्यात येत आहे. ही समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
----
‘दुर्गामाता दौड’ला
न्हावेलीत प्रतिसाद
सावंतवाडी ः हिंदू सामर्थ्य जागृत करण्यासाठी आणि तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने न्हावेली येथे रविवारी (ता. २८) दुर्गामाता दौडचे आयोजन केले होते. दौडची सुरुवात पार्सेकरवाडी येथून झाली. माऊली मंदिर, देऊळवाडी, चौकेकरवाडीमार्गे दौड काढली. या दौडला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
......................
वेंगुर्ले पुणे चिंचवड
बसच्या वेळेत बदल
वेंगुर्ले ः बसस्थानकातून सकाळी ८ वाजता सुटणारी वेंगुर्ले मठ कुडाळमार्गे पुणे चिंचवड (शिवशाही) ही बस उद्यापासून (ता. १) ७.४५ वाजता सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी केले आहे.
.........................
परुळे केंद्रशाळेमध्ये
रविवारी स्नेहमेळावा
म्हापण ः जिल्हा परिषद केंद्रशाळा परुळे क्र. ३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (ता. ५) सकाळी १० ते १ या वेळेत आयोजित केला आहे. या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेच्या प्रगतीसाठी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.