swt3037.jpg
95788
तांबुळीः शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शन करताना कृषी विभागाचे अधिकारी.
कीटकनाशक फवारणीबाबत
तांबोळीत ‘कृषी’तर्फे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३०ः तांबोळी पंचक्रोशीत यावर्षी नागली पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे; मात्र सततचा पाऊस, ढगाळ हवामान व वाढती आर्द्रता यामुळे पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच्या नियंत्रणाकरिता कृषी विभागाच्या वतीने थेट शेतात प्रत्यक्षिकाचे आयोजन केले होते.
अळीच्या या प्रादुर्भावाची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर, उप कृषी अधिकारी मनाली परब व सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद निकम यांनी सोमवारी (ता. २९) रात्री तांबोळी परिसरातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. अंधारामुळे बाहेर पडलेल्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून शेतकऱ्यांना नियंत्रणाविषयी यावेळी मार्गदर्शन केले. या कीडीचा उपद्रव भात पिकावरही होऊ शकतो. त्यामुळे बांध स्वच्छ ठेवणे, शेतात पाणी साठवणे, प्रकाश सापळे लावणे व नैसर्गिकरित्या नियंत्रणासाठी कोंबड्या, बदक सोडणे तसेच बेडकांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या व वेळेवर आपल्या शेतात फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोरे यांनी केले. तसेच कीड नियंत्रणाविषयी माहितीसाठी ''महाविस्तार'' मोबाईल अॅप डाउनलोड करून त्यात नोंदणी करावी, असेही आवाहन त्यांनी केले.