भरणेनाका रस्त्यावर खड्डेच खड्डे
वाहनचालक नाराज ; अपघातात बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १ : तालुक्यातील भरणेनाका परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. काहीदिवसांपूर्वी त्याठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भरणेनाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामधून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. हे खड्डे भरले जावेत अशी मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी उपअभियंत्यांकडे केली होती. तसे निवेदन त्यांनी दिले होते. स्मारकाजवळील त्या रस्त्यावर काहीदिवसांपूर्वी झालेल्या अपघातात ज्या चालकाचा मृत्यू झाला, त्याला
जबाबदार कोण ? असा प्रश्न सागवेकर यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या जीवितहानीची जबाबदारी बांधकाम विभाग घेणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. या रस्त्यावरील खड्डे मृत्यूचा सापळा बनलेले आहेत. अशा धोकादायक परिस्थितीत प्रशासन मुकाट्याने हातावर हात घेऊन बसलेले आहे. हे चित्र धक्कादायक आहे. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे आणि रस्ता सुरळीत करावा, अन्यथा भविष्यात अपघात झालाच तर त्याला बांधकाम संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.