- rat1p17.jpg-
P25N95923
संगमेश्वर ः ठाकरे शिवसेनेच्या लोवले शाखेच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह माजी मंत्री रवींद्र माने, जिल्हा संघटक संतोष थेराडे, जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी.
सत्ताधाऱ्यांचे विकासाऐवजी राजकारणच जास्त
रवींद्र माने ; मुचरी येथील बैठकीतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचाराला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः आजपर्यंत संगमेश्वरचा विकास हा खरा ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून झाला आहे. आज सर्वत्र रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, याला सत्ताधारी आमदार कारणीभूत आहेत. काही ठिकाणी पाण्याची समस्या होती. त्यांना दूरवरून पाणी आणावे लागत होते. त्यांच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांना कायमस्वरूपी असलेली पाण्याची समस्या मिटवली होती. त्याठिकाणी एकच मतदान झाले पण, मी तेथे विकास केला कोणताही राजकारण न करता. परंतु आताचे सत्ताधारी हे समाजकारणापेक्षा राजकारण जास्त करत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊया, असा इशारा माजी रवींद्र माने यांनी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुचरी पंचायत समिती गणातील बैठकीत ते बोलत होते. लोवले गावामध्ये बैठक घेऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. मुचरी गणाच्या बैठकीची सुरुवात लोवले येथील शुभ गंधा सभागृहातून करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, संपर्क प्रमुख सुरेश कदम, उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, संगमेश्वर शिवसेना महिला आघाडी संघटिका मेधा कदम आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम म्हणाले, आपण आपला पक्ष संकटात आहे, असे समजणे चुकीचं आहे. आज आपल्या पक्षात तुमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिक आहे. त्यामुळे शिवसेना संपवण्याची कोणामध्येही हिंमत नाही. आपला पक्ष निष्ठावान तसेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांवर प्रेम करणारा आहे, असे त्यांनी सांगितले. तर संतोष थेराडे यांनी कोणत्याही निष्ठावान शिवसैनिकांना आम्ही एकटे पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. आमच्यात दोन हात करायची ताकत आहे तेव्हा सर्व शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना संपवण्यासाठी सत्तेत बसलेले अनेकजण प्रयत्न करत आहेत. पण ही शिवसेना संपवणे कोणालाही शक्य नाही. हे आजच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बैठकीवरून सर्वांच्या लक्षात येईल. कितीही आमिषं दाखवूनही शिवसैनिक अजून जागेवर आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे, असे उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर यांनी सांगितले.
लोवलेतील बैठकीला नावडी विभाग प्रमुख वैभव मुरकर, उपविभाग प्रमुख नथुराम पडवळ, उपविभाग संघटक सिद्धेश सावंत, तेर्ये गावचे ज्येष्ठ शिवसैनिक दादा बाईत, लोवले गावचे गौतम जाधव, राजू पवार, सुभाष पाचकले, शैलेश म्हस्के तसेच लोवले गावचे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
---
चौकट
लोवलेची शाखा कार्यकारिणी जाहीर
जिल्हा प्रमुख दत्ता कदम आणि संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप बोरुकर यांनी लोवले गावची शिवसेना शाखा कार्यकारिणी जाहीर केली. त्यात शाखाप्रमुख सुभाष विश्वनाथ कदम, उपशाखाप्रमुख संतोष दिगू दोरकडे, उपशाखाप्रमुख जीवित रावजी जाधव, बूथ प्रमुख सीताराम तानू पडये, मोहन रघुनाथ मोरे,गटप्रमुख नागेश रघुनाथ चव्हाण, शाखासंघटक दिलीप भार्गव कदम जाहीर करण्यात आले.