95940
कुडाळ, मालवण तालुक्यांतील
३६ रस्त्यांसाठी ७ कोटी मंजूर
राणेंचा पाठपुरावा; लवकरच निविदा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः कुडाळ व मालवण तालुक्यांतील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग अशा एकूण ३६ रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने ६ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. याबाबत आमदार नीलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आवाज उठवला होता. यात कुडाळ-मालवण, कसाल-मालवण, पणदूर-घोटगे रस्ता या मुख्य रस्त्यांचा समावेश आहे.
गेली अनेक वर्षे कोकणातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नसून, कोकणात पडणारा प्रचंड पाऊस हा निकष लावून कोकणातील सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ असणाऱ्या रस्त्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार कुडाळ व मालवण तालुक्यांतील ३६ रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ६ कोटी ९५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. या मंजुरीनंतर तत्काळ निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश आमदार राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.