96291
शिरोड्यात सत्याग्रह स्मारक उभारा
ग्रामस्थांचे उपोषण; घोषणेला ३५ वर्षे लोटली तरी कार्यवाही धीम्या गतीने
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रह ठिकाणी भव्य सत्याग्रह स्मारक उभारावे, या मागणीसाठी तसेच स्मारकाच्या कामामध्ये होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात गांधी जयंती व विजयादशमीचे औचित्य साधून शिरोडा ग्रामस्थांतर्फे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी उपोषणस्थळी भेट देत स्मारकासंदर्भात स्वतः लक्ष घालून याचा पाठपुरावा करेन, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
इंग्रजांनी मीठावर लावलेल्या कराविरोधात महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये दांडी येथे मीठाचा सत्याग्रह केला होता. महात्मा गांधींच्या या सत्याग्रहाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा (ता.वेंगुर्ले) येथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. या ऐतिहासिक ठिकाणी भव्य असे स्मारक उभारावे, या मागणीसाठी तसेच सत्याग्रह स्मारकाची घोषणा होऊन ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला. मात्र, अजूनही स्मारकाची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याच्या विरोधात शिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, इतिहासप्रेमी व ग्रामस्थांच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
श्री. शेख यांनी तहसीलदार ओतारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून या उपोषणस्थळी शासनाचा कोणीही प्रतिनिधी आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात तहसीलदार ओतारी हे वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह उपोषणस्थळी दाखल झाले. या स्मारकाच्या जमीनी संदर्भात बरेचसे काम झाले आहे. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून या कामाचा पाठपुरावा करेन. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना या संदर्भात पहिल्यापासून पूर्ण माहिती देऊन स्मारकाची जागा शिरोडा ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्यासाठी आपण पाठपुरावा करेन, असे आश्वासन यावेळी तहसीलदार ओतारी यांनी दिले. त्यानंतर तहसीलदार ओतारी व पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले. या उपोषणात शिरोडा सरपंच लतिका रेडकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कौशिक परब, विभाग प्रमुख अमित गावडे, ग्रामपंचायत सदस्य रश्मी डीचोलकर, प्रथमेश परब, दिपक चोपडेकर, संदिप गावडे, जगन्नाथ डोंगरे, अभिजीत राणे, अण्णा गावडे, विराज राऊत, संदिप राऊत, नारायण गावडे, विशाल गावडे, देवेश गावडे, गोपीनाथ राऊत, तुषार राऊत, प्रवीण धानजी, अशोक परब, आजू अमरे, राकेश परब, भाऊ आंदुर्लेकर, महादेव परब आदी उपस्थित होते.
---
अशा आहेत मागण्या
२०३० हे ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. यापूर्वी शिरोडा गांधीनगर येथे सत्याग्रहाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारावे. जमीन हस्तांतरणापासून ते स्मारक उभारण्यापर्यंत सर्व प्रक्रिया जलदगतीने नियोजनबद्धरित्या पूर्ण करावी. जमीन हस्तांतरण प्रक्रिया २६ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करावी. १९३० ला झालेल्या मिठाचा सत्याग्रह विषयीची योग्य माहिती इतिहास प्रेमींना मिळावी यासाठी शासनाने पुढाकार घेऊन सत्याग्रह अभ्यास कमिटीची स्थापना करावी. ऐतिहासिक दृष्टीने स्मारकाची उभारणी करताना येथील भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास केला जावा. त्या विषयीचा आराखडा तयार करावा. मिठागरे ही शिरोडा गावची शान आहे. मात्र, मिठ उत्पादन व्यवसायाला नैसर्गिक आपत्तीमुळे उतरती कळा लागली आहे. या मिठ उत्पादन व्यवसायाला शासनाने बळ देऊन उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.