96532
भिरवंडे : खरीप हंगामाची भातशेती तयार होऊ लागली आहे. मात्र, पावसाचे सावट असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
भात पिक तयार; मात्र पावसाचे सावट
कणकवली परिसरातील चित्र; लहरी निसर्गामुळे शेतकरी चिंतातूर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ ः परतीच्या पावसाचा जोर अजूनही संपलेला नाही. आकाशात ढग काळवंडत आहेत. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला खरीप हंगामातील घास निसर्गराजा हिरावून घेणार की काय? अशी स्थिती आहे. पावसाने उसंत घेतली असली तरी पावसाचे सावट अजूनही पूर्णतः संपलेले नसल्याने बळीराजा पुरता चिंतातूर झाला आहे.
यंदा पावसाचे वेळापत्रक कमालीचे बदलले आहे. १५ मे रोजी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे मे महिन्यातच बहुतांशी खरीप हंगामाची भात पेरणी झाली. परिणामी, ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात भातपीक तयार झाले आहे. मात्र, परतीच्या पावसाचे वेळापत्रक अजूनही लांबले आहे. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दोन दिवसांपासून सूर्य दर्शन होत असले तरी आकाशात ढग काळवंडत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाऊस परतीचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. भात पीक तयार झाले आहे. तरीही शेत शिवारामध्ये पाणी साचले आहे. तयार भात पीक कापण्यासाठी भीतीचे वातावरण आहे. कारण, कोणत्याही क्षणी पाऊस कोसळू शकतो अशी परिस्थिती आहे.
---
दिवाळी आली तरी पाऊस थांबेना!
शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गराजा हिरावून घेईल अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. यंदा चांगले भात पीक होते. मात्र, परतीचा पाऊस अजूनही संपलेला नाही. दिवाळीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची भितपीक घेण्यासाठी तयारीत आहेत. परंतु, पाऊस मात्र थांबत नाही. त्यामुळे शेतकरी आता चिंतातूर बनला आहे.