rat5p3.jpg-
96583
संगमेश्वर ते बुरंबी रस्त्यावरील खड्डे.
खड्ड्यांत हरवला संगमेश्वर–बुरंबी रस्ता
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ः संगमेश्वर ते बुरंबी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून वाहने चालवणे जीवघेणी ठरत आहे. अनेक प्रवासीही जीव मुठीत घेऊनच प्रवास करत आहेत. त्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
देवरुख हे तालुक्याचे ठिकाण असून तेथे तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत कार्यालय अशी महत्वाची शासकीय कार्यालयं आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक लोकं विविध कामांसाठी देवरूख येथे ये-जा करत असतात. संगमेश्वरपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर लोवले येथे एक महाविद्यालय आहे. पुढे एक विद्यालय आहे. याठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करत असतात. संगमेश्वरपासून बुरंबीपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असल्याने त्यातून वाहने चालवणे सर्वच चालकांसाठी तारेवरची जीवघेणी कसरत ठरत आहे. शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांच्या पसरलेल्या साम्राज्यामुळे एक खड्डा चुकवला तर दुसरा खड्ड्यातच जाणार आहे.
बुरंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा देवरुख ग्रामीण, संगमेश्वर ग्रामीण तसेच खासगी दवाखान्यात या मार्गावरून उपचारासाठी रुग्णांना नेताना खड्डयातील प्रवासामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट होत आहे. याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे गरोदर महिलांना आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण व खासगी दवाखान्यात दर महिन्याच्या तपासण्या करण्यासाठी याच खड्ड्यातील रस्त्यावरून प्रवास कराव लागत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संगमेश्वर तालुका आमसभेत एका नागरिकाने संगमेश्वर-देवरुख रस्त्याबाबतची परिस्थिती मांडली होती. त्यानंतर कार्यवाही होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली आहे.
चौकट
अपघाताला निमंत्रण देणार खड्डे
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्यांचे अंदाज न आल्याने काही दुचाकींचे किरकोळ अपघात झाले आहेत. राज्यात व जिल्ह्यात खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. काही लोकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. सबंधित विभागाने खड्ड्यांवर मलमपट्टी न करता दर्जेदारपणे खड्डे भरले पाहिजेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.