rat5p1.jpg
96578
लांजाः येथील भाकर सेवा संस्थेच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनात देहदान संकल्प केलेल्या व्यक्ती.
बारा आजी-आजोबांनी केला देहदानाचा संकल्प
भाकर सेवा संस्था ; कोंड्येतील आजी-आजोबांचे गाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ः लांजा येथील भाकर सेवा संस्थेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी १२ जणांनी देहदानाचा संकल्प करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या निर्णयाचे कौतुक सर्वत्र होत असून याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
लांजा तालुक्यातील भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आजी आजोबांचा गाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात झाला. कै. अरुणा पाटील व देवेंद्र पाटील यांच्या कल्पनेतील पूर्ण झालेले स्वप्न २१ ऑगस्ट २०२१ पूर्ण झाले. चार वर्ष आजी-आजोबांचा गाव या नावाने भाकर सेवा संस्थेमार्फत कोंड्ये येथे चालविले जात आहे. निराधार, गरजु वृध्द आजी-आजोबांना राहण्याची सुव्यवस्था, जेवणाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे हसते-खेळते घरासारखे वातावरण, मनोरंजनाच्या सुविधा, वैद्यकीय सुविधा, डे - केअर सेंटर, मनसोक्त आनंद घेऊन जगण्याची इच्छा पूर्ण केली जाते. परकेपणाची कोणतीही जाणीव करून न देता स्वतःच्या आजी आजोबांच्या प्रमाणे काळजी घेतली जाते. याठिकाणी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनात आजी-आजोबांचा गाव येथे दिवसभर विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमावेळी रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रेशम जाधव यांनी आजी-आजोबांचे तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांचे देहदान व अवयव दानाचे अर्ज भरून घेतले. एकाचवेळी १२ जणांनी देहदानाची तयारी दर्शवली आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. याबाबत समाजसेवक युयुत्सु आर्ते, भाकर सेवा संस्थेचे संचालक पवनकुमार मोरे, सचिव अश्विनी मोरे , संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. भाकरचे फ्रंट लाईन वॉरियर्स शीतल धनावडे, पूर्वा सावंत, कोमल सोलिम, निकिता कांबळे, जनार्दन सावंत यांच्यासह समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे उपस्थित होत.
चौकट
वैद्यकिय तपासणी शिबिर
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाची सुरुवात सनोफी पिरॅमल स्वास्थ्य संस्थेमार्फत वैद्यकिय तपासणी शिबिराने झाली. शिबिरामध्ये सर्व वृद्धांचे संपूर्ण वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मनोरंजनात्मक खेळ झाले. त्यामध्ये गरबा, संगीत खुर्ची, पिलो पासिंग, स्लो वॉक, अचूक बादलीत बॉल टाकणे अशा खेळांचा समावेश होता. काहींनी गाणी म्हटली. पुनर्वसन केंद्रातील महिलांनीही यात सहभाग घेतला होता.