रस्त्यात कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेची नजर
खेड शहरात सीसीटीव्ही कॅमेरे ; दीपावलीनंतर दंडात्मक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत खेड नगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छोत्सव मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. भर रस्त्यात कचरा टाकून शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळातही दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुका-ओला कचरा वेगळा करण्याचे आवाहन नागरिकांना वारंवार केले जात असले तरीही काही नागरिक कानाडोळा करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, नगरप्रशासनाने दीपावलीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तसेच बचतगटांनाही मोहिमेत सामील करून स्वच्छता उपक्रम अधिक गतिमान करण्यात आला आहे. पालिकेच्या या उपक्रमामुळे बेशिस्तपणे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना चाप बसेल आणि शहर अधिक स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.