96626
पर्यावरणसमृद्ध भागातून ‘शक्तिपीठ’ दुर्दैवी
जयेंद्र परुळेकर ः वाघाच्या दर्शनानंतर सरकारवर टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः दोडामार्ग-सावंतवाडी सह्याद्री पट्ट्यातील वनसंपदा आणि वन्यजीवसृष्टी किती समृद्ध आहे, हे वारंवार होणाऱ्या पट्टेरी वाघाच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. केर येथे नुकतेच वाघाचे दर्शन झाले आहे. असे असतानाही आंबोली-गेळे ते घारपी-फुकेरी-तांबोळी-असनिये-डेगवे या इको-सेन्सिटिव्ह भागातून शक्तिपीठ महामार्ग रेटून नेण्याचा राज्यकर्त्यांचा दुराग्रह हास्यास्पद आणि दुर्दैवी असल्याची टीका डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.
श्री. परुळेकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सह्याद्री पट्ट्यात सातत्याने वाघांचे दर्शन होत असल्याने हा भाग समृद्ध जैवविविधता आणि विपुल वन्यजीव असलेला महत्त्वाचा वाइल्डलाइफ कॉरिडॉर आहे हे स्पष्ट होते. अशा संवेदनशील कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून महामार्ग काढणे हे या परिसरातील पर्यावरणासाठी आणि वन्यजीवांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. आधीच विविध कारणांमुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. याच जंगलतोडीमुळे गवेरेडे सावंतवाडीसारख्या शहरांमध्ये पाळीव जनावरांसारखे भरदिवसा दिसू लागले आहेत. आता वाघही अनेक ठिकाणी दिसत आहेत, ही परिस्थिती भयावह आहे. जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीव मानवी वस्तीत येत आहेत. काही दिवसांपूर्वी ओंकार हत्ती अनेक गावांमध्ये शेती-बागायतीचे नुकसान करत असताना, त्याला अंबानींच्या ''वनतारा'' मध्ये पाठवण्याचे प्रयत्न सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी केले होते. आता पट्टेरी वाघांना देखील आमदार तिथेच पाठवण्यासाठी प्रयत्न करणार काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
-------------
फेरविचार व्हावा
ज्याप्रमाणे राजकीय अस्थिरतेच्या वेळी आमदार सुरतला गेले होते, तशाच प्रकारे येथील वन्यजीव आता गुजरातला ‘वनतारा’मध्ये पाठवायला सुरुवात झाली, तर राज्याचे आणि पर्यायाने जिल्ह्याचे वनखाते बंदच करायचे काय? जनतेचे कोट्यवधी रुपये ज्या वनखात्यावर खर्च होतात, त्या खात्याची गरजच काय० अशी चर्चा सध्या सामान्य नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे समृद्ध वन्यजीव कॉरिडॉरमधून महामार्ग काढण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची आणि वन्यजीव संरक्षणासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे, असेही श्री. परुळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.