96651
मोबाईलचा उपयोग सतर्कतेने करा
ॲड. नकुल पार्सेकर ः नेमळे प्रशालेत जनजागृती कार्यक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः आधुनिक तंत्रज्ञानाने आपले दैनंदिन जीवन सुसय्य केले असले तरी, मोबाईलचा वापर करताना आणि समाज माध्यमांद्वारे व्यक्त होताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मोबाईलच्या अतिवापराने निर्माण झालेल्या सामाजिक व मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी जबाबदारीने उपयोग करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले.
नेमळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘मोबाईलचे दुष्परिणाम व समाजमांध्यमांचा वापर’ या विषयावर अटल प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘एआय’मुळे या क्षेत्रात झालेल्या विलक्षण बदलांचा आणि एका सेकंदात जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात संवाद साधता येण्याची व हवी असलेली माहिती मिळवता येण्याची व्यवस्था उपलब्ध झाल्याचा उल्लेख केला. व्यासपीठावर अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्र, सावंतवाडीच्या समुपदेशक अर्पिता वाटवे उपस्थित होत्या.
सौ. वाटवे म्हणाल्या, ‘‘मोबाईलमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शालेय मुलेसुद्धा मोबाईलच्या आहारी जाऊन सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत. ज्या वयात मुलाने आपल्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे, अशावेळी मोबाईलमुळे त्यांची दिशा भरकटत आहे. एखाद्या मुलाकडून गुन्हा घडला तर सुधारित कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊन अशा मुलांची रवानगी बालगृहात केली जाते. यामुळे पालकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे आणि संभाव्य परिणाम टाळले पाहिजे.’’
मुख्याध्यापिका कल्पना बोवलेकर यांनी स्वागत केले. यावेळी नेमळे पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर, महिला जिल्हाध्यक्षा इंटरनॅशनल ह्युमन राईट वेलफेअर असोसिएशनच्या मानसी परब, अटल प्रतिष्ठानच्या कार्यालयीन प्रमुख ज्योती राऊळ आदी उपस्थित होते. सहकारी शिक्षक अनिल कांबळी यांनी सूत्रसंचालन केले.