96658
शाळेच्या प्रगतीसाठी एकोप्याचा संकल्प
चराठेत रंगला स्नेहमेळावा; शैक्षणिक गरजा, सुविधांबाबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २५ ः भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे क्र. १ येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात शाळेच्या प्रगतीसाठी एकोप्याने काम करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.
मेळाव्याचे अध्यक्ष दिगंबर पावसकर यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुलांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने उपस्थितांचे मन जिंकले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुलींनी गायलेले ''ही आवडते मज मनापासूनी'' हे गीत ऐकून सर्वजण भारावले.
मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट केले. रघुनाथ वाळके यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. चंद्रकांत वेजरे, काका परब, पुरुषोत्तम परब, गोविंद परब, दर्शन धुरी, विश्राम कांबळी, श्रावणी कोठावळे यांनी शाळेच्या जुन्या दिवसांतील गंमती-जमती आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
या मेळाव्यात शाळेच्या गरजा, सुविधा आणि प्रगती यावर सखोल चर्चा झाली. माजी अध्यक्ष समीर नाईक, रघुनाथ वाळके यांनी शाळेपुढील समस्या मांडल्या. अध्यक्ष उमेश परब यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन केले. माजी मुख्याध्यापिका वर्षा देसाई यांनी शाळेची यशोगाथा सांगितली. पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश विशद केला. दुपारी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, ओंकार पावसकर, नीलेश नाईक नियोजन केले. ग्रामस्थ रुपेश नाटेकर, रघुनाथ वाळके, उमेश परब, ग्रामपंचायत, धनदा शिंदे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका पेडणेकर, श्रीमती कुंभार आदी उपस्थित होते. आदिती चव्हाण यांनी आभार मानले.