नफ्याचे आमिष दाखवून
साडेअकरा लाखांना गंडा
संशयित महिलेविरुद्ध गुन्हा ः कमी वेळात जास्त नफ्याचा हव्यास नडला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका, असे वारंवार पोलिस प्रशासनाकडून सतर्क केले जात असतानाही कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात वाढतच आहेत. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत एका महिलेने व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठवून एकाला ११ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी संशयित महिलेविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारिया (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) असे फसवणूक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना ४ जुलै ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची संशयित मारिया नावाच्या महिलेबरोबर फेसबुकवर ओळख झाली होती. त्या महिलेने आपण ट्रेडिंग संदर्भात सल्लागार म्हणून काम करत असल्याचे तक्रादाराला सांगितले. मारियाने गोल्ड ट्रेडिंगमधून कमी वेळात जास्त नफा मिळतो, असा विश्वास तक्रारदाराला दिला. त्यानंतर मारिया हिने व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठवून ते तक्रारदार यांना त्यांच्या मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले. हळूहळू संवाद वाढवत मारियाने तक्रारदाराला गोल्ड ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. काही काळानंतर गुंतवणूक केलेल्या रकमेची तक्रारदाराने मारियाकडे विचारणा केली. तेव्हा तिने कंपनीच्या नियमाप्रमाणे ६ लाख १३ हजार ६४७ रुपये इतके भरावे लागेतील, असे सांगितले. मनी लॉड्रिंग झाल्यामुळे तुमचे बँक खाते तात्पुरते गोठवण्यात (सस्पेक्टेड) आल्याचे मारियाने सांगितले. त्यामुळे तुम्हाला सर्व रक्कम भरावी लागेल, असे मारियाने तक्रारदाराला बजावले. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेवरील कोणताही लाभांशही मारियाने दिला नाही. यामध्ये तक्रारदाराची ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमद्वारे सायबर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.