सावंतवाडीत दोघांवर
मटकाप्रकरणी गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः शहरात मटका जुगार खेळल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय चव्हाण आणि अक्षय सावंत, अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील भाजी मार्केटजवळ कल्याण मटका जुगारावर आकडे घेणाऱ्या एका ६६ वर्षीय वृद्धासह आकडे पुढे पाठवून कार्यवाही करत असलेल्या अन्य एका तरुणावर कारवाई करण्यात आली. विजय बाबाजी चव्हाण (वय ६६, रा. उभाबाजार) याला भाजी मार्केटजवळ अवैधपणे कल्याण मटका जुगाराचे आकडे घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्या तसेच १ हजार ९३० रुपये रक्कम जप्त करण्यात आली. चव्हाण हे घेतलेले हे आकडे अक्षय सावंत याला पुढे देत होते. त्यानुसार पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्याखाली विजय चव्हाण आणि अक्षय सावंत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल धुरी, महेश जाधव, श्री. शिंगाडे आणि पवन परब यांनी केली.