खेड शहरात मटका-जुगाराचा सुळसुळाट
कायदा सुव्यवस्थेला तडा ; कडक कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : खेड शहर सध्या अवैध मटका आणि जुगाराच्या विळख्यात अडकले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये हे धंदे उघडपणे सुरू असून, स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. ऑनलाइन गेम सेंटर आणि लॉटरी दुकानांच्या आडून जुगाराचे व्यवहार खुलेआम सुरू असल्याचे उघड झाले आहे.
खेड पोलिस ठाण्यापासून काहीच अंतरावर दिवसरात्र सुरू असलेले हे बेकायदेशीर धंदे कायदा-सुव्यवस्थेच्यादृष्टीने गंभीर चिंतेचा विषय ठरत आहेत. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, समाजातील तरुणवर्ग या व्यसनाच्या जाळ्यात सापडत आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या हाती लागलेल्या काही व्हिडिओ क्लिप्स आणि पुराव्यांमधून शहरात मटका-जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तातडीने या अवैध धंद्यांवर कारवाई करून दोषींना अटक करण्यात यावी, अशी जनतेची मागणी आहे.
यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे खेड हे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मतदार संघ आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मतदार संघातच कायदा-सुव्यवस्थेची अशी अवस्था निर्माण होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे.
----------
चौकट
मंत्री राणे यांच्याप्रमाणे कारवाईची अपेक्षा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मंत्री नीतेश राणे यांनी त्यांच्या मतदार संघात चाललेल्या मटका जुगार अड्ड्यावर स्वतः छापे टाकून कडक कारवाई केली होती. दापोली विधानसभा मतदार संघात देखील अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------
कोट
खेड शहर परिसरात अवैध धंदे तेजीत सुरू आहेत. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हे सुरू असलेले धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत.
--विनोद चाळके, तालुकाध्यक्ष भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.