97313
नळातून पाणी नव्हे, वाहतोय आजार!
सावंतवाडी पालिका चडीचूप; सालईवाडा भागांत गढूळ, फेसाळलेला पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपताना दिसत नसल्याचे चित्र आहे. शहरातील सालईवाडा भागात फेसाळलेले गढूळ पाणी नळाद्वारे येत असल्याचा प्रकार आज उघड झाला. या भागात गेल्याच आठवड्यात नळाच्या पाण्यातून किडे आल्याचे पुढे आले होते. या प्रकाराबाबत पालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याबाबत गेल्या वर्षभरात अनेक अडचणीसमोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांना आधीच डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत गढूळ पाणीपुरवठ्याबाबतही प्रकार पुढे येत आहेत. असे असूनही पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडे प्रश्न मांडून ते सुटत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका नळपाणी योजनेतून गढूळ आणि फेसाळलेले पाणी पुरवले जात असल्याची तक्रार पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी पालिकेकडे केली आहे. पालिकेच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
----
यापूर्वीही किडेयुक्त पाणीपुरवठा
यापूर्वी २५ जुलै आणि २७ सप्टेंबरलाही याच नळ योजनेतून किडेयुक्त पाणी आले होते. त्याबाबतची तक्रारही जयंत बरेगार यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मात्र, तक्रारीनंतर पालिकेकडून पाण्याचा नमुना घेतला होता. त्या नमुन्यावर काय कारवाई झाली, याची माहिती अद्याप दिलेली नाही. त्यानंतर २७ सप्टेंबरला पुन्हा किडे आढळल्याने तक्रार केली गेली. या तक्रारीनंतर २९ सप्टेंबरला सकाळी सहा वाजता श्री. लाखे आणि श्री. चितारी अशी नावे सांगून दोघे जण पाण्याचा नमुना घेण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी स्वतःचा हुद्दा किंवा ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्याने, श्री. बरेगार यांनी त्यांना नमुना देण्यास स्पष्ट नकार दिला. सक्षम हुद्याचे कर्मचारी ओळखपत्रासह नमुना घेण्यासाठी पाठवावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत पालिकेचा कोणताही कर्मचारी नमुना घेण्यासाठी आला नाही.
--
कोट
सावंतवाडी येथील निमिश प्लाझा, कंटक पाणंद, सालईवाडा परिसरात मंगळवारी (ता. ७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नळातून सुमारे तासभर गढूळ आणि फेसाळलेले पाणी आले. वारंवार दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पालिका प्रशासनाने उचित आणि तातडीची कारवाई करावी.
- जयंत बरेगार, सामाजिक कार्यकर्ते
---
पालिका का गप्प?
दरम्यान, पालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख प्राजक्ता कांबळे यांच्याशी संपर्क साधून बाजू देण्याबाबत सांगितले असता उशिरापर्यंत त्यांनी त्या संदर्भात बाजू दिली नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी पालिका प्रशासनाकडून का खेळ सुरू आहे, असा प्रश्न जागृत नागरिकांनी केला आहे. शिवाय या समस्येची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.