लोककलेच्या निधीतून साकारणार ज्ञानाचं मंदिर!
वडदहसोळ शाळेची इमारतीची होणार पुनर्बांधणी; ‘कलगीतुरा’चे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः तालुक्यातील वडदहसोळ येथील माध्यमिक विद्यामंदिराच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने कोकणची लोककला ‘कलगीतुरा’ सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘आमचा गाव आमचा विकास संघटना’, शाळेचे मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी आणि पालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संकलित झालेला निधी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या माध्यमिक विद्यामंदिरच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
वडदहसोळ आणि परिसरातील मुलांना माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या गावातील ग्रामस्थांनी तब्बल ३० वर्षापूर्वी माध्यमिक शाळा सुरू केली. शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना चांगली बैठक व्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गावातील लोकांनी एकजुटीने अंगमेहनतीने प्रशालेच्या इमारतीची उभारणी केली. या शाळेतून आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल केले आहे. काळाच्या ओघामध्ये प्रशालेची इमारत सद्यःस्थितीमध्ये जीर्ण झाली आहे. इमारतीचे लाकडी सामान मोडकळीस आलेले असून, भिंतीही धोकादायक झालेल्या आहे. एकंदरीत, सद्यःस्थितीमध्ये प्रशालेच्या सुसज्ज इमारतीची उभारणी करणे गरजेचे असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीचीही आवश्यकता आहे. हा निधी उभा करण्यासाठी ‘आमचा गाव आमचा विकास संघटना’, शाळेचे मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कलगीवाले शाहीर बावकर आणि तुरेवाले शाहीर विकास लांबोरे यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यामध्ये दोन्ही शाहिरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
चौकट
अशीही सामाजिक बांधिलकी
कलगीवाले शाहीर बावकर आणि तुरेवाले शाहीर विकास लांबोरे यांनी ‘कलगीतुरा’ या लोककलेच्या माध्यमातून साऱ्यांचे मनोरंजन करताना निधी संकलनासाठी योगदानही दिले. कलगीवाले शाहीर बावकर यांनी या कार्यक्रमासाठी मिळालेली संपूर्ण रक्कम शाळेसाठी देणगी म्हणून दिली. तुरेवाले शाहीर विकास लांबोरे यांनी स्वखुशीने दिलेली रक्कम घेऊन शाळेसाठी आर्थिक मदत म्हणून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.