swt921.jpg
97599
आचराः रस्त्यावर झाडाची फांदी पडून दुचाकीचा चक्काचूर झाला.
ग्रामस्थांचा ‘स्वतःचा आपत्ती निवारण’ प्रयोग!
पोटशीर्षक: फांदी, तुटलेल्या तारा, अंधार या सर्वांवर श्रमदानाने केली मात
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ९ः आचरा देवूळवाडी पुजारेवाडी येथील पिंपळाच्या वृक्षाची मोठी फांदी विद्युत वाहिनीसह कोसळली. याबाबत आपत्ती व्यवस्थापनला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले. अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ही फांदी हटवून रस्ता मोकळा केला. आपत्ती व्यवस्थापनच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
आचरा देवूळवाडी पुजारेवाडी येथील पिंपळाच्या वृक्षाची मोठी फांदी मंगळवारी रात्री (ता. ७) दीड वाजण्याच्या सुमारास कोसळली. यात नजीकची विद्युत वाहिनीही जमीनदोस्त झाली. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. फांदी रस्त्यावर कोसळल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला होता. ही फांदी रस्त्यावर उभी केलेल्या दुचाकीवर पडल्याने दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. विद्युत तारा तुटून पडल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तुटलेल्या तारा ओहोळाच्या पाण्यात पडल्याने धोका निर्माण झाला होता. येथील ग्रामस्थ रमेश पुजारे, सदा पुजारे, वीरेंद्र पुजारे आदींनी या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थानला दिली; मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत रात्रपाळीला असलेले या वाडीतील पोलिस कर्मचारी मनोज पुजारे यांना माहिती मिळताच तातडीने ते महिला पोलिस कर्मचारी ज्योती परब यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ दादा बापर्डेकर यांना माहिती देऊन वीज वितरणला फोन करून वीज पुरवठा खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सहाय्यक अभियंता सौरभकुमार वर्मा यांनी वायरमन पोंभुर्लेकर यांच्या मदतीने वीजपुरवठा खंडित केला.
दादा बापर्डेकर, सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी जेसीबी मालक अजय साटम यांना विनंती करत जेसीबी उपलब्ध करून दिला. पोलिस हवालदार पुजारे यांनी लाकूड तोडकाम करणारे विक्रांत आचरेकर यांना संपर्क केला. त्यांच्या सहकार्याने फांद्या कापून पहाटे चार वाजेपर्यंत रस्ता मोकळा केला. ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, प्रशांत सावंत, रामदास घाडी, रुपेश पुजारे, गणपत पुजारे, संजय शिर्सेकर, उदय पुजारे आदींसह अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले. विद्युत मंडळाने दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करून दिला.
रामेश्वर मंदिराकडे सुरू असलेल्या उत्सवामुळे रस्ता मोकळा होण्याची आवश्यकता होती. गांभीर्य ओळखून पोलिस, ग्रामस्थांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला रात्री दोनच्या सुमारास याची कल्पना दिली; मात्र फोनच उचलला गेला नाही. तसेच दुसऱ्या दिवशीही दखल घेण्याचे सौजन्य संबंधित यंत्रणेने घेतले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.