97768
सावंतवाडी पालिकेच्या सर्व जागा लढवू
निशांत तोरसकर ः मित्र पक्षांशी चर्चा करून रणनीती ठरवू
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः आगामी पालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेना नगराध्यक्षांसह नगरसेवकाच्या सर्व जागा लढवणार आहे. तशा प्रकारची तयारी पक्षाकडून सुरू आहे. मात्र, आघाडी धर्म पाळून मित्र पक्षांशी सल्लामसलत करूनच पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती शहर संघटक निशांत तोरसकर यांनी येथे दिली. शहरातील विविध समस्यांकडे सत्ताधारी पक्षांकडून आणि येथील आमदारांकडूनही दुर्लक्ष झाले आहे. पर्यायाने विरोधक या नात्याने वेळोवेळी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत आलो आहोत. त्यामुळे पैशाच्या जीवावर निवडून येणार हा भ्रमाचा भोपळा यावेळी येथील सुज्ञ जनता निश्चितच फोडणार असल्याचा दावाही श्री. तोरसकर यांनी केला.
शहरातील आपल्या संपर्क कार्यालयात श्री. तोरसकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका मांडली. उपजिल्हाप्रमुख शब्बीर मणियार, शहरप्रमुख शैलेश गंवडळकर, महिला शहर संघटक समीरा खलील, महिला आघाडीप्रमुख श्रुतिका दळवी, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, शेखर सुभेदार आदी उपस्थित होते. श्री. तोरसकर म्हणाले, ‘सावंतवाडी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी बोललो आहे. या ठिकाणी ठाकरे शिवसेना नगराध्यक्ष पदासह नगरसेवक निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहेत. तशा प्रकारची चाचपणीही केली आहे. सद्यस्थितीत नगराध्यक्षासाठी आमच्याकडे तीन ते चार चेहरे आहेत. मात्र, त्यांची नावे आता उघड करणार नसून निवडणुकीची रणनीती पाहता समोरचा उमेदवार पाहून आम्ही ती जाहीर करू. मात्र, हे करत असताना आघाडीचा धर्म पाळून मित्र पक्षांसह मनसे पक्षालाही विश्वासात घेणार आहोत. काही झाले, तरी ठाकरे शिवसेना या ठिकाणी नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या जागा लढवणार आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘सावंतवाडी शहरात संघटनेच्या माध्यमातून काम करताना आम्ही जनतेचे विविध प्रश्न हाताळत आहोत. मात्र, त्यामानाने सत्ताधारी राजकीय पक्षांकडून नेहमीच अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष राहिले आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी शहराचा विचार करता आरोग्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे. रोजगाराच्या दृष्टीने या ठिकाणी काहीच उद्योग व्यवसाय नाही. ठिकठिकाणी दारूचे अड्डे पाहायला मिळत आहेत. घरफोडीसारखे प्रकारही वाढले आहेत. येथील सुरक्षा व्यवस्था ढिली झाली असून, शहरातील सौंदर्य असलेले बसस्थानकाची अवस्था बिकट आहे. अशा विविध प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे पर्यायाने स्थानिक आमदाराचे दुर्लक्ष राहिले आहे. त्यामुळे या सगळ्याला येथील जनता कंटाळली असून, सुज्ञ जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच त्यांना जागा दाखवेल. ‘आम्ही पैशाच्या जीवावर निवडून येणार’, हा विरोधकांचा भ्रमाचा भोपळा या निवडणुकीमध्ये निश्चितच फुटणार आहे.’
----------------
आयात उमेदवार पक्षात घेणार नाही
आज भाजपमध्येच गटातटाचे राजकारण पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी नगरसेवकांसाठी इच्छुक असलेले काहीजण आमच्याही संपर्कात आहेत. मात्र, आम्हीही समोरच्या व्यक्तीची पात्रता पाहूनच त्यांना आमच्याकडे घ्यायचे की नाही? हे ठरवणार आहोत. शक्यतो आम्ही कुठलाच आयात उमेदवार पक्षात घेणार नसल्याचे यावेळी श्री. तोरसकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.