माजगावात उद्या
सांगता सोहळा
सावंतवाडी ः माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा रविवारी (ता.१२) सायंकाळी ५ वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे गोंविद मसके, माजी अध्यक्ष व राज्य ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त अनंत उर्फ आनंद वैद्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, ज्येष्ठ लेखक प्रवीण बांदेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी अध्यक्ष दीपक पेटकर, माजगाव ग्रामपंचायत सरपंच रिचर्ड डिसिमेलो आदी उपस्थित राहणार आहेत. माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळ ३ सप्टेंबर १९७५ ला स्थापन झाले असून, ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव हा माजगाववासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. ग्रंथालयाच्या या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत गावातील सर्व घटकांचे योगदान राहिले असून त्याचा गौरव साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कार्यवाह सतीश मालसे, ग्रंथपाल सौ. मधु कुंभार यांनी केले आहे.
------
ओटवणेत १९ ला
नरकासुर स्पर्धा
ओटवणे ः गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळातर्फे रविवारी (ता.१९) रात्री १० वाजता ओटवणे नं. १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, कोनशी, बावळाट, तांबोळी, असानिये, चराठा, कारीवडे, माजगाव या गावांसाठी मर्यादीत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००२ रूपये (बबलू गावकर पुरस्कृत), द्वितीय पारितोषिक ५००२ (उमेश गावकर पुरस्कृत), तृतीय पारितोषिक ३००२ (महेश गावकर पुरस्कृत) तसेच उत्तेजनार्थ १००२ रुपयांची तीन पारितोषिके आहेत. इच्छुक स्पर्धकांनी १८ पर्यंत उदीत गावकर आणि प्रथमेश गावकर यांच्याकडे नावे द्यावीत, असे आवाहन चौगुलेवाडी मित्रमंडळाचे बबलू गावकर आणि महेश गावकर यांनी केले आहे.
-------------
मोबदला वाटप शिबिर
ऐणारी येथे उत्साहात
सिंधुदुर्गनगरी ः ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत अद्याप मोबदला न मिळालेल्या धारकांसाठी ग्रामपंचायत ऐणारी (ता. वैभववाडी) येथे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात भूसंपादन प्रस्ताव क्र. २२/२००७ अंतर्गत एकूण २४ मोबदला धारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मोबदला मिळवला. शिबिरास भूसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, सरपंच श्रीमती सुर्वे, पोलिसपाटील, ग्रामस्थ, भुईबावडा येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी व जलसंधारण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. उपविभागीय जलसंधारण अधिकारी शिरोडकर यांनी इतर खातेदारांनाही कागदपत्रांविषयी मार्गदर्शन केले.
--------------
अभ्यासक्रमांचे
ऑनलाईन उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी ः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी (ऑनलाईन) पद्धतीने उद्घाटन झाले, असे ओरोस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमात नवी मुंबई विमानतळाचे थेट प्रक्षेपण तसेच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाईव्ह प्रसारण कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. कार्यक्रमास सुमारे ३०० प्रशिक्षणार्थी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य ए. एस. मोहारे यांनी स्वागत केले. गटनिर्देशक गोरे यांनी सूत्रसंचालन केले. पद्मश्री रमाकांत आचरेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीपाद दामले आदी उपस्थित होते.
-------------
‘स्टँन्ड अप’साठी
प्रस्तावाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः केंद्र शासनाच्या ‘स्टँन्ड अप इंडिया’ योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी १५ टक्के मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे अटी व शर्ती पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
---
सावंतवाडीत
गायन मैफल
सावंतवाडी ः सुरश्री सावंतवाडी प्रस्तुत शास्त्रीय उपशास्त्रीय गायन मैफल शनिवारी (ता.११) सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत गोविंद चित्रमंदिर सावंतवाडी या ठिकाणी आयोजित केली आहे. या मैफलीत सौ. मृदुला तांबे-सुतार (पुणे) या गायन करणार असून त्यांना तबला साथ उत्पल सायनेकर (गोवा) तर संवादिनी नीलेश मेस्त्री (सावंतवाडी) हे करणार आहेत. या मैफलीसाठी दीडशे रुपये देणगी प्रवेशिका ठेवली असून तरी रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे, असे आवाहन मंजिरी धोपेश्वरकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.