-rat१७p१६.jpg-
२५N९९२१२
राजापूर ः सुशोभीकरण करण्यात येत असलेला जवाहरचौकातील नन्हेसाहेब पूल.
-------
राजापुरातील ‘नन्हेसाहेब पुला’चे रूपडे पालटणार
सुशोभीकरणाचे काम सुरू; ब्रिटिशकालीन पूल, बैठक व्यवस्थेसह विजेची सोय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत असताना जवाहर चौकातील नन्हेसाहेब पुलाचे पालटणारे रूपडं सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या विशेष प्रयत्नाने या पुलाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून, या पुलाला नवा साज चढताना राजापूर शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
शहरातील जवाहरचौक व त्याला लागून असलेला कोदवली नदीवर नन्हेसाहेब पूल आहे. हा ब्रिटिशकालीन पूल असूनही आजही भक्कमपणे उभा आहे. या पुलामुळे शहराचे दोन भाग जोडले गेले असल्याने या पुलाला विशेष महत्त्व आहे. या पुलावर रिक्षास्टँड आहे तसेच सायंकाळी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणूनही या पुलाला विशेष पसंती आहे. त्यामुळे या पुलाचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून शहरवासियांतून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत माजी आमदार खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी या पुलाच्या सुशोभीकरणासाठी निधी मिळवून दिला. सद्यःस्थितीत सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ऐतिहासिक पुलाला आकर्षक अशा रेलिंग बनवण्यात आल्या असून, बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे शिवाय आकर्षक अशा पद्धतीने लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून या पुलाचा उपयोग शहरवासियांना होणार आहे.
----
चौकट
पुलाबाबत निश्चित माहितीचा अभाव
राजापूर शहरामध्ये नगरपालिकेची सुमारे ८५ वर्षापूर्वी स्थापना झाली. इंग्रजांचे काही वर्ष राजापुरात वास्तव्य होते. त्यांच्या आधिपत्याखालीच पालिकेची १९४० मध्ये स्थापना झाली. त्यामुळे ब्रिटिशांच्या येथील वास्तव्याच्या खाणाखुणा सांगणाऱ्या काही स्मृती राजापुरात आहेत. त्यापैकी नन्हेसाहेब पूल एक असल्याचे सांगितले जाते. कोदवली नदीवर बांधण्यात आलेला जवाहरचौकातील नन्हेसाहेब पूल नेमका कधी बांधला, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. तरी ब्रिटिशांच्या काळामध्ये पुलाचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. या पुलाचे जुन्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचे चिरेबंदी दगडी बांधकाम असून आजही मजबूत स्थितीमध्ये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.