कोकण

साधेपणातील जगण्याची श्रीमंती, कोकणातील दिवाळी

CD

rat19p3.jpg
99493
वसुबारसेला मंडणगड येथे गोठ्यातील गाई-गुरांचे पुजन करताना शेतकरी.

rat19p4.jpg
99494
दिवाळीत बाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी.

इंट्रो

कोकण हा उत्सवी परंपरा जपणाऱ्या लोकांचा प्रदेश. येथे शहरीकरणाने आता ग्रामीण भागही बदलतोय. मात्र कोकणातील काही मोजक्या भागात आजही सांस्कृतिक प्रथा-परंपरा टिकून आहेत. सांस्कृतिक प्रथा-परंपरा जपणाऱ्या कोकणातील घरांसमोर, चौकात, वाड्या-वस्त्यांवर आकाशकंदिलाचा झगमगाट कमी असला तरी बांबूच्या कामट्यांपासून बनविलेला आकाशकंदील पाहायला मिळेल. हा आकाशकंदील आम्हा कोकणवासियांना पूर्वजांचे स्मरण करण्याची प्रेरणा देतो. गावच्या मंदिरातील दीपमाळा उजळवणे, तांदळाच्या गोड बोरांचा पारंपरिक फराळ, देवदिवाळी, गुरांच्या गोठ्याची पूजा, तुलसीविवाह, शेणाने सारविलेल्या अंगणातील मंद दिव्यांची रोषणाई याचा अनुभव, अनुभूती ग्रामीण कोकणातच.
- धीरज वाटेकर, चिपळूण
dheerajwatekar@gmail.com


साधेपणातील जगण्याची श्रीमंती, कोकणातील दिवाळी

कोकणात दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीला होते. तत्पूर्वी वसुबारस झालेली असते. घरे स्वच्छ करून आकाशकंदील प्रज्ज्वलित होत असतो. पूर्वी फटाके दुर्मीळ असले तरी घरोघरी असंख्य पणत्या पेटायच्या. या दिवशी कोकणातील घराघरात बालगोपाळांचे छोटे-मोठे किल्ले जवळपास तयार होत आलेले असतात. आजही ही प्रथा टिकून आहे. या दिवशी धनाची म्हणजेच श्रीलक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी पूजनच्या निमित्ताने कडुनिंबाची पाने खाण्याची किंवा तळ कोकणात ‘सातवीण’ वृक्षाच्या सालीचा रस प्राशन करण्याची प्रथा आहे. दिवाळीत सारे अंगण शेणाने सारवलेले असते. सारवलेल्या जागेवर सुंदर रांगोळी. नरक चतुर्दशी, हा अभ्यंगस्नानाचा आणि दिवाळीतील महत्त्वाचा दिवस. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. हे अभ्यंगस्नान नारळाच्या रसाने करण्याची प्रथा आहे. स्नानानंतर डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट फोडणे या विधीस पारंपरिक मान्यता आहे. कारीट हे कोकणात वेलीवर वाढणारे काकडीसारखी चव असणारे परंतु कडू फळ आहे. या कडू फळाचा प्रतिकात्मक वध करून मानवी शरीरातील सर्व कटुता आणि वाईट गोष्टी नष्ट होण्यासाठीची प्रार्थना केली जाते. हा विधी नरकासुर वधाचेही प्रतिक मानला जातो. काही भागात आजही अंगणातील तुळशी वृंदावनासमोर ‘कारीट’ फोडले जाते. घराभोवती कदाचित नसेल पण तुळशीभोवती शेण सारवून किमान चुन्याची रांगोळी काढलेली असते.
दक्षिण कोकणात नरक चतुर्दशीला ‘चावदिस’ म्हणतात. चावदिस म्हणजे ‘चौ+दिस’. पंधरवड्यातील चौदावा दिवस. कोकणात पूर्वी आश्विन-कार्तिक महिन्यातली थंडी कुडकुडवणारी असायची. दिवाळीपूर्वी कोकणातील घरात भात (नवान्न) कापून, झोडून, बांधून ठेवलेले असायचे, आजही असते. दिवाळीत गारठवून टाकणाऱ्या थंडीमुळे वातावरण प्रफुल्लित करणारं असते. कानी विविध पक्ष्यांचे मंजुळ स्वर ऐकायला मिळत असतात. चावदिस जवळ आला की नवीन धान्याचे (भाताचे) पोहे करण्यासाठी धावपळ सुरु होते. त्याच्याही अगोदर नवीन भात घरात आलं की व्हायनात कुटून पोहे करायची पद्धत होती. सिंधुदुर्गातील काही भागात भातापासून तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांचं महत्त्व आजही टिकून आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर प्रसादाला ‘साळी’ (लाह्या) आणि ‘बत्तासे’ वाटण्याची प्रथा आजही सुरू आहे. घरात, दुकानात ताटामध्ये पैसे, नाणी ठेवून त्याचीच लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. जमा-खर्चाच्या वह्या बदलल्या जातात. कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस हा, विक्रम संवत्सराचा पहिला दिवस तसेच दिवाळी पाडव्याचा दिवस म्हणून विशेष महत्त्वाचा आहे. कोकणातील बहुतेक मंदिरातील दीपमाळा त्रिपुरारी पौर्णिमेला उजळून निघतात. दिवाळीच्या दिवसात कोकणातील मंदिरांतील दीपमाळांवर होणारे दीपोत्सव आवर्जून भेट देऊन अनुभवावेत.
कोकणातील शेतकऱ्यांमध्ये नरकचतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवसापर्यंत शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. देवदिवाळीला घरा-घरात धान्यलक्ष्मीचे आगमन झालेले असते. कोकणात देवादिकांच्या जत्राही देवदिवाळीपासून सुरू होतात. नरकचतुर्दशीप्रमाणे देवदिवाळीलाही काही ठिकाणी अभ्यंगस्नान होते पण गोठ्यातल्या गुरांचे! गोठ्यात दिवे लावले जातात, ओवाळलं जातं. तळकोकणात देवदिवाळीचा विडे ठेवण्याचा विधीही केला जातो. देवदिवाळीला कृषिप्रधान बळीराजाचे स्मरण केले जाते. ''इडा पीडा टळो, माझ्या बळीचं राज्य येवो!'' या उक्तीचा जागर कोकणात देवदिवाळीला होतो.
कोकणातील ग्रामीण भागातील दिवाळी अजूनतरी आपली आगळी-वेगळी रित जपून आहे. आम्ही तिच्या आठवणी जपून ठेवल्यात. ‘स्त्रीजीवन’ ग्रंथात साने गुरुजी यांनी भाऊबीज संदर्भाने काही ओव्या दिल्यात. त्या कोकणातील दिवाळीशी आपली भेट घडवतात. सासरी गेलेली बहीण माहेरच्या प्रेमासाठी, भावाच्या भेटीसाठी, त्याच्याकडून निरोप वा पत्र यावे यासाठी कशी अधीर झालेली असते याचे वर्णन,
‘पूर ओसरले, अजून का न भाई आले ।
नवरात्र गेले, नेण्याला का न आला । ।
नदीनाले शांत झाले बहिणीसाठी ।
दसरा दूर गेला भाईराया।।’
इथे भेटते. तर
दुपारचे ऊन घाटी डोंगर कोण घेतो
बहीणीसाठी भाऊ येतो भाऊबीजे ।।
दुपारचे ऊन लागते सणसण
शेला घेतो पांघरून भाईराया ।।
तांबडें पागोटे उन्हाने भडक्या मारी
सुरूच्या झाडाखाली भाईराया ।।
या कोकणच्या वर्णनात बहिणीला भाऊ येणार असे तिला वाटू लागल्यानंतरच्या मानसिक स्थितीचे वर्णन आले आहे. कोकणातल्या घरांत दिवाळी झाली तरी दिवाळीचं वातावरण तुळशीच्या लग्नापर्यंत कायम असतं. हिरव्या पानांचा साज आणि मंजिरीचं वैभव अंगावर मिरवणाऱ्या तुळशीचं अंगणातील लग्न (बार्शी) कोकणात आजही कार्तिकी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत हौसेने होतं असतं. तुळशीच्या मुळाशी चिंचा, आवळे ठेवले जातात. पूर्वी तुलसी विवाहानंतर चिंचा आणि आवळे खायला सुरवात व्हायची. कोकणात न मिळणारा ऊस आता तुळशीच्या लग्नात मांडवाला असतो. तुळशीच्या पुढ्यात काटक्या रोवून त्याला साडी चोळी नेसवली जाते. गळ्यामध्ये मंगळसूत्र, हार असे दागिने घातले जातात. घराच्या देव्हाऱ्यातला बाळकृष्ण ताम्हानात आणला जातो. दोघात अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून हा विवाह संपन्न आजही होतो. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती टेंबेस्वामीमहाराज (माणगाव-कुडाळ) यांच्या चरित्राच्या पहिल्या खंडात दिवाळीत तुलसीविवाह हा वाडीवाडीमध्ये साजरा होणारा सामुदायिक सण असल्याचे म्हटले आहे. वाडीतील सर्व मंडळी एकत्र जमून प्रत्येक घरासमोरील तुळशीचा विवाह पार पाडतात. आपलं जीवन सुखकर, आनंदी, आरोग्यदायी करणाऱ्या सगळ्या गोष्टी संस्कृतीने पूजनीय मानल्या आहेत. निसर्गावर कुरघोडी न करता त्याच्या हातात हात घालून पुढे जाण्याची आपली परंपरा आहे. फराळात तांदळाची गोड बोरं, गावठी पोह्याचा चिवडा, शंकरपाळ्या, आईला मदत करून बनविलेल्या करंज्या, रव्याचा किंवा बेसनचा लाडू असतो. कोकणात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीत पोह्यांना खूप महत्त्व असते. दिवाळीनंतर गावागावात ग्रामस्थांचे मेळावे होतात. हे मेळावे शक्यतो ग्रामदेवतेच्या देवळात असतात. देवाला गाऱ्हाणे घातले जाते. भांडण तंटे विसरून पुढे जायचं हे कोकणचे वैशिष्ट्य आहे.
कोकणात गणेशोत्सवापासून पारंपरिक भजने सुरु होतात. गावा-गावातील भजनी मंडळी नवरात्रीतही जागर करतात. भातशेतीची कापणी संपताच पिकलेलं भात घरात येतं. याच धावपळीत दिवाळीचे दिवस सरतात आणि तुलसी विवाहाने कोकणातील दिवाळीची समाप्ती होते. लहानपणी या दिवाळीचा आनंद मिळवण्यासाठी आधी सहामाही परीक्षेचे अग्निदिव्य पार करावे लागे. आताही लागतेच !
आमच्या आयुष्याची पहिली २४ वर्षे कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चिपळूण तालुक्यातील अलोरे चाळीत गेलीत. या चाळीतील दिवाळीची मज्जा काही और होती. दिवाळीच्या पहाटे सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा बारा वाजताच बंद व्हायचे. कोणीही कोणाच्याही घरात ये-जा करायचे. एका घरातील वस्तू, पदार्थ, जिन्नस अनेक घरात फिरायचे. कसलाही औपचारिकपणा नव्हता. धड्डड्डम्म्म्म् करून मोठा आवाज व्हायचा आम्ही अर्धवट झोपेतून जागे व्हायचो. अभ्यंगस्नान झाल्यावर फटाके निवडणे, माळा सोडवणे चालायचे. लवंगीची माळही सोडून वेगळी केली जायची.
नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्यंगस्नानापूर्वीच पहिला फटका कोण उडवणार0 याची जणू स्पर्धा लागलेली असावी, असे दिवस आम्ही अलोरे कॉलनीत अनुभवलेत. या दिवसात कोकणातील व्हाळाला पाणी असायचं! त्या पाण्यात मजा चालायच्या. पावसाळ्यात मजा करण्याची हिम्मत नसायची. ‘व्हाळ’ हा शब्द बहुधा ''ओहोळ'' वरून आला असावा. तर यातल्या काही व्हाळावर साकव असायचा. साकवावरून चालताना काय मस्त वाटायचं सांगू0 छोटासा पूल, पाण्याचा खळाळता प्रवाह, प्रवाहातले दगड! दुर्दैवाने आज या व्हाळाचे नाले झालेत. आमचं मन मात्र व्हाळाला ‘नाला’ म्हणायला कचरते, अशी दिवाळी आम्ही अनुभवलेय!
कोकणातील पूर्वीची घरं चौकोनी कलाकुसरीचा जणू देखावा होती. काही गावांत आजही ती बघायला मिळतात. अशा घराच्या भिंती मातीच्या किवा विटांच्या मापानी बनवलेल्या असायच्या. त्यांना शेणामातीने सारवून गुळगुळीत केलेले असायचे. वरती कौलारु छत आणि वलई करुन पायाखालची जमीनही शेणाने सारवलेली असायची.येथील दिवाळीचा बाज अस्सल कोकणी.
कोकणातील घराचा माळा म्हणजे जणू अलिबाबाची गुहाच! नित्य आवश्यक नसलेले साहित्य माळ्यावर ठेवले जायचे. हा माळा म्हणजे ‘काळ आलेल्या वस्तूंची जागा’ असं पूर्वीच्या आज्यांच्या तोंडून ऐकलेलं आठवतं. सुट्टीत आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील तळवडे (लांजा) आणि केळशी (दापोली) येथे आजोळी आणि मूळगावी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत गेल्यावर आम्हाला जणू ‘कोकण’चं भेटायला आल्यासारखं वाटायचं. दिवाळीला तिथे नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या छोटेखानी न्हाणीघरात केलेले अभ्यंगस्नान आठवते. चोपण्याने चोपून (वलई) खळं (जमीन) आणि शेणाने जमीन सारवली जायची. तेव्हा बालपणी पाहिलेली आणि केलेली ही कामे म्हणजे ‘कला’च आहेत, असं आता वाटतं. कोकणातील वाड्या वस्तीतील सौहार्दाचे संबंध आजही टिकून असून हा इथल्या ग्रामसंस्कृतीतील शिष्टाचार आहे. ‘सामुदायिक आणि वैयक्तिक जीवन विकासाच्या दृष्टीने आपल्या संस्कृतीत सणावारांचे महत्त्व अधिक आहे. व्यक्ति, समाज आणि देश हे परस्परांना पूरक व्हावेत यासाठी हे दंडक आहेत. प्रकाशमय राहणी म्हणजे दिवाळी. स्वतःचे मालीन्य नाहीसे करण्यासाठी अभ्यंगस्नान करून शुद्ध कपडे घालावे. ज्या घरी आपण राहतो ते घर स्वच्छ करावे. या सामुदायिक सणांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसे प्रसन्न व्हावीतच! पण गुरेढोरे, गाईम्हशी ह्याही सेवेचा बोजा उचलतात, त्यांनाही प्रसन्न करणे हे महत्वाचे .
साधेपणातील जगण्याची श्रीमंती मिरवणाऱ्या कोकणात पारंपरिक दिवाळी निसर्ग समृद्ध असायची. ती अतिशय साधेपणाने साजरी व्हायची. अंगणात एखादा बांबूचा कंदील, एक पणती आणि गिरणीवरून आणलेले नवान्न भाताचे पोहे एवढीच दिवाळी ‘गोड’ मानलेल्या पिढीने कालचं समृद्ध-निसर्गरम्य कोकण सांभाळलं! परिस्थिती गरिबीची असली तरी उत्सवाची आणि मनाची श्रीमंती घरोघरी हमखास दिसत राहिली. ‘

--------
चौकट १

कोकणच्या जंगलातील दिवाळी

दिवाळीच्या तोंडावर कोकणात शेतकऱ्यांनी शेतातील पीक कापून घरी आणलेले असते. त्यामुळे शेतकरी आपले पशुधन चरण्यासाठी मोकाट सोडत असतात. पशुधनाला चरण्यासाठीची कुरणे कोकणात आजही दिसतात. या पशुधनाचं हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण व्हावे यासाठी कोकणात वाघबारस आजही साजरी केली जाते. गोवत्स द्वादशीला म्हणजेच वसुबारसदिनी किंवा दिवाळीच्या दिवसात वाघबारस साजरी होते. कोकणातील सह्याद्रीच्या कडेकपारित राहाणारा आदिवासी समाजाचा तर हा मुख्य सण आहे. आदिवासी किंवा शेतकरी निसर्गदेवतेची आराधना करून पशुधनाचे रक्षण करण्याची निसर्गाला प्रार्थना करत असतात. कोकणातील काही गावात (तोंडवली) वाघेश्वराची मंदिरे आहेत. यातून निसर्ग आणि मानव याचे नाते अधोरेखीत होते. या कालावधीत जंगलात ‘जीवो जीवस्य जीवनम्’प्रमाणे दिवाळी सुरूच असते. २०१३ मध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी आम्ही, ज्याच्या मार्गावरून प्रवास करणे इतर प्राणी टाळतात अशा दुर्मिळ असलेल्या ''कोळशिंदा'' (रानकुत्रा) टोळीने चौकुळ गावातील (आंबोली) जंगल भागात केलेल्या सांबर मादीच्या पिल्लाच्या ''किलिंग अॅक्टीव्हीटी''चा (शिकार) थरार अनुभवला होता. सांबर मादी कोळशिंद्यांच्या हातून निसटलेली पण सांबराचे पिल्लू त्यांना सापडले होते. ‘कोळशिंदा भक्ष्याला न ठार मारताच खायला सुरुवात करतात’ हे आम्ही तेव्हा प्रथमच पाहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT