99534
सोनुर्ली परिसरात चार फुटी मगर पकडली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः तालुक्यातील सोनुर्ली गावामध्ये पुन्हा एकदा मगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. सोनुर्ली-पाटये कुंभेवाडी येथील शेतकरी नंदू तारी यांच्या शेततळ्यामध्ये सुमारे चार फूट लांबीची मगर वन विभागाने पकडली. अलीकडेच काही दिवसांपूर्वी लगतच असलेल्या वेत्ये गावामध्ये १२ फूट लांबीची मगर पकडली होती. ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोनुर्ली-पाटये कुंभेवाडी भागातील शेतकरी तारी यांच्या मालकीच्या शेततळ्यात आज सकाळी ग्रामस्थांना मगर दिसली. मगरीचे दर्शन होताच, तातडीने वन विभागाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, वन विभागाचे जलद कृती दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली जवान शुभम कळसुलकर, प्रथमेश गावडे, राकेश अमृसकर यांनी अत्यंत कुशलतेने आणि काळजीपूर्वक सुमारे चार फूट लांबीच्या मगरीला जेरबंद केले. मगरीला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वन विभागाने तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. काही दिवसांपूर्वीच सोनुर्लीपासून जवळच असलेल्या वेत्ये गावामध्ये कलेश्वर मंदिरालगतच्या ओहोळात सुमारे १२ फूट लांबीची महाकाय मगर पकडण्यात आली होती. त्यानंतर आता सोनुर्ली गावातही मगर सापडल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. शेतकरी, तसेच लहान मुलांना शेतीत किंवा पाण्याच्या जवळ जाताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.