01182
जिल्ह्यात ‘सरदार @१५० युनिटी मार्च’
जिल्हाधिकारी ः वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्राच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, ‘माय भारत’द्वारे ‘सरदार @१५० युनिटी मार्च’ सुरू केला आहे. यानिमित्त ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान देशभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून आठ ते दहा किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये किमान ५०० युवक सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली. यावेळी ‘मेरा युवा भारत’चे उपसंचालक कालिदास घाटवळ, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, ‘एनसीसी’चे हितेश कुमार, ‘एनएसएस’चे धोंडू गावडे आदी उपस्थित होते.
अभियानात शुक्रवारी (ता. ३१) जिल्हास्तरीय पदयात्रा काढण्यात येईल. प्रत्येक संसदीय क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये १ दिवसाची ८-१० किलोमीटरची पदयात्रा असेल. पदयात्रेपूर्वी स्थानिकांमध्ये वातावरणनिर्मितीसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावरील चर्चासत्र, पथनाट्ये असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. याखेरीज ड्रग्जमुक्त भारताची प्रतिज्ञा, संस्थांमध्ये स्वदेशी मेळावे आयोजित करणे, ‘गर्वाने स्वदेशी’ अशी प्रतिज्ञा तरुणांमध्ये घेतली जाणार आहे. या काळात योग आणि आरोग्य शिबिरांसह स्वच्छता मोहीम राबवली जाईल.
पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या पुतळ्याला अथवा चित्राला आदरांजली, ‘आत्मनिर्भर भारत’ची प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण होणार आहे. कॅबिनेट मंत्री, खासदार, स्थानिक प्रशासन, ‘माय भारत’ आणि ‘एनसीसी’, ‘एनएसएस’ अधिकारी या यात्रेचे नेतृत्व करतील. राष्ट्रीय पदयात्रा २६ नोव्हेंबरला करमसद ते केवहिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत १५२ किलोमीटरची आयोजित केली जाणार आहे.
.......................
‘माझे भारत’ पोर्टलवर नोंदणी
सर्व नोंदणी आणि उपक्रम ‘माझे भारत’ पोर्टलवर होत आहेत. या पोर्टलवर नोंद करून जिल्ह्यातील तरुणांना या ऐतिहासिक उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नोंदणी केल्याशिवाय उपक्रमात सहभाग नोंदविता येणार नाही. उपक्रमात नागरिकांचा सहभाग मिळण्यासाठी राज्याने महेश सारंग (सावंतवाडी), प्रकाश गोगटे (देवगड), सुमित सावंत (मालवण) आणि हेमंत गावडे (वेंगुर्ले) यांची निवड केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.