विद्याभारती गुरुकुलचे शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : चिपळूण येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकूल पंचकोश गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर पालघर येथे उत्साहात पार पडले. पालघर जिल्ह्यातील पडघे येथील ग्रामीण शिक्षणसंस्थेच्या निवासी आश्रमशाळेत आठ दिवसांचे हे शिबिर झाले.
या शिबिराचे उद्घाटन ग्रामीण शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष नितीन वझे यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच अनिल हाडळ व विद्याभारती कोकण प्रांताचे सहमंत्री विवेक पितळे यांची उपस्थिती होती. शिबिरात परिसर भेट, श्रमसंस्कार, क्षेत्रभ्यास, आदिवासी घरांना भेटी, परिसरातील लघुउद्योगांना भेटी, मुलाखती, बौद्धिक चर्चासत्र, खेळ, सातपाटी बंदर, जव्हार संस्थान, कर्णबधिर व दिव्यांग मुलांची शाळा, अमूल व कॅम्लिन कंपन्यांना भेट इत्यादी उपक्रमांचे आयोजन या शिबिरामध्ये करण्यात आले होते. या शिबिरात पालघर जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती या विषयावर प्रसिद्ध वक्ते रवींद्र भुरकुंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रसिद्ध मुखपृष्ठकार व राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार उमेश कवळे यांनी व्यंगचित्र आणि चित्रकला ही कार्यशाळा घेतली तर ‘वारली चित्रकला’ या विषयावर उद्योजक व चित्रकार अंकुश अतकरी यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना मार्गदर्शन केले.
---