सिंधुदुर्गात दुबार मतदारांचा शोध
निवडणूक अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी सुरू; मतदारांना द्यावे लागणार हमीपत्र
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ : देशभरात दुबार आणि बनावट मतदारांबाबत विरोधी पक्षांकडून जोरदार आवाज उठवला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये किती दुबार अथवा त्यापेक्षा जास्त मतदार आहेत. त्याची यादीच आता निवडणूक आयोग सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवणार आहे. या अधिकाऱ्यांकडे संबधित मतदारांची खात्री करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्याबाबतचे निर्देशपत्र निवडणूक आयोगाने प्रत्येक तहसीलदारांना पाठवले आहे. सिंधुदुर्गातही याची अंमलबजावणी झाली असून यंत्रणा कामाला लागली आहे.
दुबार मतदान होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. यात दुबार मतदारांबाबत काय कारवाई करावी याचे निर्देश दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, दुबार मतदारांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दुबार किंवा त्यापेक्षा मतदार’ असलेली यादीच तपशीलवारपणे सादर केली जाणार आहे. या यादीची तपासणी संबधित अधिकाऱ्यांनी करावयाची आहे. तसेच प्रत्येक दुबार मतदाराला पत्र पाठवून एका पेक्षा अधिक गट किंवा गणामध्ये नाव नोंदवले असेल तर, त्यातील एकच गट किंवा गण कायम ठेवण्याबाबतचे हमीपत्र त्या मतदाराकडून घ्यावयाचे आहे.
जर एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेला मतदार एकच व्यक्ती असल्याची खात्री पटली, तर विहित नमुन्यात अर्ज घेऊन तो नेमका कोणत्या प्रभागात, जिल्हा परिषद विभागात किंवा पंचायत समिती गणात मतदान करणार आहे, हे निश्चित करावे.
चौकट
‘दुबार मतदार’ नोंदवण्यासाठी सूचना
प्राधिकृत अधिकाऱ्याची खात्री पटल्यानंतर मतदाराला त्याच्या इच्छेनुसार मतदान केंद्र निश्चित करता येईल आणि केवळ त्या केंद्रातच त्याला मतदानाचा अधिकार असेल. अशा दुबार मतदाराच्या इतर प्रभाग, विभाग किंवा गणातील नावांसमोर ‘दुबार मतदार’ ही नोंद करताना, त्याने निवडलेल्या मतदान केंद्राचे नाव, क्रमांक आणि मतदाराचा अनुक्रमांक नमूद करण्याचे बंधनकारक केले आहे. अशा मतदाराला अन्य कोणत्याही ठिकाणी मतदान करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
चौकट
...तर हमीपत्र द्यावे लागणार
मतदान केंद्रावर असा दुबार मतदार मतदानास आल्यास, त्याने इतर कोणत्याही केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत विहित नमुन्यात हमीपत्र लिहून द्यावे लागेल. मतदान केंद्राध्यक्षांनी मतदाराची ओळख काटेकोरपणे पटवून केवळ एकाच ठिकाणी मतदानाची संधी द्यावी. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
कोट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी मतदार यादी अचूक असावी, या दृष्टीने निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दुबार अथवा एका व्यक्तीचे अनेकदा नाव नोंदले असेल तर त्याचीही यादी दिली जाणार आहे. अशा मतदारांबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही होईल.
- दीक्षांत देशपांडे, तहसीलदार, कणकवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.