शिष्यवृत्ती मार्गदर्शक
शिक्षकांसाठी मार्गदर्शन
बांदाः विद्यार्थी हिताला प्राधान्य देत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडी यांच्या वतीने तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे. हा वर्ग येथील आरपीडी प्रशालेमध्ये १४ नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या वर्गाचा उद्देश शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रभावी, अद्ययावत आणि परिणामकारक मार्गदर्शन मिळावे, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे हा आहे. वर्गामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून परीक्षेतील नव्या बदलांविषयी, अध्ययन पद्धती तसेच वेळेचे नियोजन याबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. संघटनेने शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेला हा प्रयत्न सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे तालुकाध्यक्ष विजय गावडे, सचिव रुपेश परब, महिला सेल अध्यक्षा शुभेच्छा सावंत आणि सचिव रोशनी राऊत यांनी सांगितले.
.......................
साळगावात शनिवारी
पुण्यतिथी सोहळा
कुडाळः साळगाव येथील खानोलकर महाराज यांचा २८ वा पुण्यतिथी उत्सव शनिवारी (ता. ८) साजरा करण्यात येणार आहे. साळगाव येथील त्यांच्या समाधी मंदिरात हा उत्सव होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजा व १०.४५ ते दुपारी १२.४५ पर्यंत नामदेव महाराज भक्त मंडळ यांचा हरिपाठ, करुणात्रिपदी व भजन तसेच दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद व रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीप्रकाश (अरविंद) प्रभूखानोलकर यांनी केले आहे.
....................
कणकवलीत रविवारी
वारकरी दिंडी सोहळा
कणकवलीः सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे रविवारी (ता. ९) कणकवलीत वारकरी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष व संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठगमन वर्ष यानिमित्त वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ९ वाजता एसटी वर्कशॉप येथील गणेश मंदिर येथून दिंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. तेथून कणकवली बाजारपेठमार्गे परमहंस भालचंद्र महाराज आश्रमपर्यंत हा दिंडी सोहळा होणार आहे. दुपारी १२ वाजता भजन व आरती, तर १ वाजता महाप्रसाद, २ वाजता वारकरी सन्मानपत्र वितरण करण्यात येणार आहेत.
.....................
परुळेत जानेवारीत
एकांकिका स्पर्धा
म्हापणः परुळे येथील युवक कला-क्रीडा मंडळाच्या वतीने अॅड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २ ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे ३५ वे वर्ष आहे. स्पर्धेतील प्रथम चार विजेत्या संघांना अनुक्रमे १५ हजार, १२ हजार, ८ हजार व ५ हजार रुपये व इतर वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी २० डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करायची आहे. प्रथम येणार्या बारा संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. ही स्पर्धा येथील देव आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर होणार आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी प्रथमेश नाईक यांच्याशी संपर्क साधावा.
.........................
आंबडोस येथे आज
वार्षिक जत्रोत्सव
मसुरेः आंबडोस येथील ग्रामदैवत देव रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ६) साजरा होत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जुने नवस फेडणे व नवीन नवस बोलणे कार्यक्रम, रात्री ११.३० वाजता देव रवळनाथाची ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक, नंतर बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दुसर्या दिवशी सकाळी गाडगे फोडणे हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.