कोकण

सिंधुदुर्गात बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

CD

02819

सिंधुदुर्गात ‘मोठा भाऊ’ ठरणार कोण?
शिवसेना शिंदे गट की भाजपः आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिल्ह्यातील राजकीय सत्ताधीश ठरवणाऱ्या असणार आहेत. शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ‘मोठा भाऊ कोण?’ हे यात ठरणार आहे. यात राज्यस्तरावरील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सिंधुदुर्गच्या राजकारणात २०१४ पासून मोठे बदल सुरू झाले. त्यापूर्वी सलग २५ वर्षे जिल्ह्यात एकहाती सत्ता राखणाऱ्या नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का लागला. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत स्वतः नारायण राणे यांचा पराभव झाला; मात्र त्याचवेळी नवख्या असलेल्या नीतेश राणे यांचा विधानसभेत विजय झाला. त्याचवेळी राज्यात आणि केंद्रात राणे असलेल्या काँग्रेसचा पराभव होऊन भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता आली. यातून त्यांच्या जिल्ह्यातील सिंहासनाला धक्का लागला. खासदार विरोधी पक्षाचा तसेच तीन पैकी दोन आमदार विरोधी पक्षाचे निवडून आले. त्यातच दीपक केसरकर पालकमंत्री झाले. त्यामुळे राणे यांना विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसावे लागले.
विरोधी पक्षाचा हा सिलसिला केंद्र आणि राज्यात कायम राहिला तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र राणेंचीच ताकद राहिली. २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद आणि २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांचेच वर्चस्व राहिले. त्याच दरम्यान राणे यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांची ताकद पुन्हा वाढू लागली. त्यांची आणि भाजपची ताकद एकत्र झाल्याने त्यांच्या सत्तेची पाळे अधिक खोलवर गेली. याच ताकदीच्या जोरावर २०२१ मध्ये पालिका आणि २०२२ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची मोर्चे बांधणी त्यांनी सुरू केली, पण या या निवडणुकाच झाल्या नसल्याने दीर्घकाळ सत्ता संघर्षाची प्रतीक्षा राहिली.
निवडणुका पुढे गेल्या तरी विद्यमान पालकमंत्री नीतेश राणे कणकवली आणि आमदार नीलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली काम करीत होते. याचवेळी शिवसेनेत उभी फूट पडली. दीपक केसरकर यांनी शिवसेनेतील शिंदे गटाला साथ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुती अधिक प्रबळ झाली; मात्र तोपर्यंत २०२४ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत भाजपने उमेदवारी खेचून आणीत नारायण राणे यांना रिंगणात उतरविले. यावेळी जिल्ह्यातील मतदारांनी नारायण राणे यांना कमालीची पसंती दिली. विरोधी उमेदवाराला रत्नागिरी जिल्ह्यात मोठे लीड मिळत होते. त्याचवेळी हे मिळालेले लीड तोडत सिंधुदुर्गातील मतदारांनी राणे यांना मताधिक्य दिले. यामुळे राणे यांचा म्हणजेच भाजपचा विजय झाला. या विजयाने सिंधुदुर्गात मध्यंतरी २०१४ ते २०२४ या कालावधीत असलेली विरोधी पक्षाची लाट ओसरली असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले होते. त्यामुळे भाजपचा वारू सुसाट सुटला होता. आता विधानसभेत आपण तिन्ही मतदार संघात सत्ता आणणार, अशी खूण गाठ या पक्षाने बांधली.
विधानसभेत मात्र जिल्ह्यात शिवसेनेला दोन तर भाजपला एक जागा मिळाली. महायुतीची पक्षीय सोय लक्षात घेऊन दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सहमतीने नीलेश राणे शिंदे शिवसेनेत गेले. या लढतीत कणकवलीतून भाजपच्या तिकिटावर नीतेश, तर कुडाळमधून नीलेश राणे आमदार झाले. सावंतवाडीत केसरकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे निवडून आले तरी भाजप जिल्ह्यात महायुतीत मोठा भाऊ समजू लागली. कारण परिस्थिती तशीच होती. भाजपचा १०० टक्के पाठिंबा मिळाल्याशिवाय शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार निवडणून येणे अशक्यच होते, परंतु कालांतराने या दोन्ही पक्षात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली. त्यातूनच एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घेण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे महायुतीत वाद होऊ लागले. त्याचे आरोप एकमेकांवर होऊ लागले. त्यानंतर एकमेकांचे कार्यकर्ते न घेण्याचा समजूतदारपणा दाखविण्यात आला, परंतु पक्ष वाढविण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने सुरूच राहिला.
कुडाळमध्ये आमदार नीलेश राणे यांना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यांची खंबीर साथ लाभली. त्यामुळे या दोघांचाही कुडाळ आणि मालवणमध्ये शिवसेना वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला. सावंतवाडी मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना वाढविण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत; मात्र संजू परब यांच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याला जिल्हाप्रमुख केल्याने त्यांनी यात पुढाकार घेतला. त्यातूनच स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचे विचार दोन्ही पक्षांनी बोलून दाखविण्यास सुरू केले. स्वबळावर लढण्याचा अंतिम निर्णय झाला नसला तरी दोन्ही पक्षांत मैत्रिपूर्ण लढती होतील, हे आता जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या निवडणुका ''मोठा भाऊ कोण0'' हे ठरविणाऱ्या असणार आहेत.
पालकमंत्रिपद भाजपकडे असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायत यांच्यावर भाजपचीच सत्ता असावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यातच जिल्ह्याचे अडीच वर्षे पालकमंत्री राहिलेले रवींद्र चव्हाण सध्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा या लढतीत भाजपला सत्तेवर आणणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे. शिवाय दीर्घकाळ जिल्ह्यात सत्ता गाजवणारे नारायण राणे याच पक्षाकडे आहेत. दुसरीकडे तीन पैकी दोन विधानसभेत शिवसेनेचे आमदार आहेत. आठ पैकी पाच पंचायती, आठ पैकी पाच पंचायत समित्या आणि ५० पैकी ३३ जिल्हा परिषद मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात येतात. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेची सत्ता असावी, अशी भूमिका आमदार नीलेश राणे तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब यांची आहे. त्यातच या जिल्ह्याचे अडीच वर्षे पालकमंत्रिपद भूषविलेले व जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेने जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनाही रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत शिवसेना मोठ्या भावाच्या रुपात असावी, असे वाटत आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत जिल्ह्यातील मोठा भाऊ कोण0 हे ठरविणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीतील राजकीय वर्चस्व निश्चित होणार आहे.
....................
कोट
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या पक्षाची सत्ता यावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना वाटत असते. तीच भावना भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेची आहे. त्यानुसार आमचे पक्षाच्या पातळीवर काम सुरू आहे.
- दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख, शिवसेना
..................
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेना यांचीच ताकद राहिलेली आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे. युती करून निवडणूक लढल्यास त्यांना संधी मिळणार नाही. यामुळे बंडखोरी होऊन विरोधकांना संधी मिळू शकते. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप
....................

चौकट
असे होते पक्षीय बलाबल
प्रशासक राजवट लागू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. तसेच मालवण, कणकवली, देवगड, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी या सहा पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता होती, तर वेंगुर्ले आणि दोडामार्ग पंचायत समित्यांवर पूर्वीच्या शिवसेनेची सत्ता होती. कणकवली नगरपंचायत, सावंतवाडी आणि वेंगुर्ले पालिकेवर भाजपची सत्ता होती. केवळ मालवण पालिकेवर पूर्वीच्या शिवसेनेची सत्ता होती.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी

शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Buldhana Crime : मध्य प्रदेश मधील अग्नी शस्त्र निर्मिती; गृह खात्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Junnar Leopard's : जुन्नर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवनाधिकार धोक्यात; वन विभागाला तातडीची नोटीस!

Pune News : झेडपीच्या ४६ शिक्षकांवर होणार कारवाई; दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांहून कमी

SCROLL FOR NEXT