03007
03008
03009
श्रद्धेने ओथंबला सोनुर्ली श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव
तुलाभार, देवीच्या कौलाने सांगता; हजारो महिलांसह पुरुषांकडून नवस फेड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः भक्तांच्या अलोट गर्दीत, आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष, महिला भाविकांनी सोनुर्ली श्री देवी माऊली चरणी लोटांगण घालून नवस फेडला. गुरुवारी (ता.६) रात्री देवीच्या प्रांगणात जत्रोत्सवात झालेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी उसळली होती. आज दुसऱ्या दिवशी तुलाभाराने आणि देवीच्या कौलाने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.
दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीचा दोन दिवस चालणाऱ्या लोंटागणाच्या जत्रोत्सवाला काल रात्री दरवर्षीप्रमाणे तुफान गर्दी उसळली. यावेळी मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. दिवसभर असलेल्या तुरळक गर्दीचे रुपांतर रात्री आठनंतर भाविकांच्या जनसागरात पाहायला मिळाले. रात्री साडेदहाला देवीची पालखी कुळघराकडून वाजत गाजत मंदिरात दाखल झाल्यानंतर अकरा वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. पुरुष भक्तांनी जमिनीवरुन लोटांगणे घातली तर महिलांनी चालत नवस पूर्ण केले. संपूर्ण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालून हे लोटांगण पूर्ण केले जाते.
नवस फेडण्यात यंदा महिलांची संख्या लक्षणीय होती. लोंटागणाचा कार्यक्रम सुरू होताच श्री देवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकाठीसह भक्तांना दर्शन दिले. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क होती. पोलिस अधीक्षकांनी बंदोबस्ताची पाहणी केली. सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांचेही उत्सवावर लक्ष होते. देवस्थान समितीने लोटांगण घालणाऱ्या महिला, पुरुष भक्तासांठी आंघोळीची व्यवस्था केली होती.
जत्रेचा दुसरा दिवस गावकरी मंडळींना देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यास राखीव ठेवला जातो. त्यामुळे जत्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गावकर मंडळी आणि केळी कुळाने देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली. याचवेळी सुरू असलेल्या आगळ्यावेगळ्या तुलाभार कार्यक्रमालाही मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविक आपल्या वजनाएवढे वस्तू देऊन नवस फेड करतात. दुपारनंतर देवीच्या संचारी अवसाराने जत्रोत्सव पार पडल्याचा कौल दिल्यानंतर जत्रोत्सवाची सांगता झाली.
------------
वाहतुकीचे चोख नियोजन
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलिस प्रशासनाने वाहतुकीचे चोख नियोजन केल्याने जत्रोत्सवात काहीच अडचण व अनुचित घडले नाही. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेअभावी काही ठिकाणी वाहतूक कोंडी वगळता जत्रोत्सव सुरळीत झाला.
-------------
एसटीकडून चांगली सेवा
सोनुर्ली जत्रोत्सवाला दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बस फेऱ्या सोडल्या जातात. यावर्षी एसटीकडून चांगली व्यवस्था केली होती. त्यामुळेच भाविकांना सोनुर्लीत दाखल होऊन देवीचे दर्शन घेणे सोपे झाले. अनेकांनी ‘एसटी’च्या व्यवस्थेबाबत आभार मानले.
----------------
व्यापाऱ्यांची मोठी उलाढाल
सोनुर्ली जत्रोत्सवावर पावसाचे सावट असल्याने व्यापारी वर्गातून भीती व्यक्त होत होती. मात्र, संपूर्ण जत्रोत्सव होईपर्यंत पावसाचे विघ्न न आल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय होऊन मोठी उलाढाल पाहायला मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.