-Rat७p२०.jpg
२५O०२९८५
मंडणगड : चिंचघर, जावळे गावांच्या परिसरात पावसाने शेतात साचलेल्या पाण्यात भिजलेले भातपीक हे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा विदारक अंत दाखवणारे चित्र.
------
मंडणगडमध्ये ३२८ हेक्टर क्षेत्र बाधित
पावसामुळे ३५ लाखांचे नुकसान; १५०० शेतकऱ्यांना फटका, भरपाईची प्रतीक्षा
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः मंडणगड तालुक्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. भात, नाचणी आणि वरीसारख्या प्रमुख पिकांखालील ३२८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तालुक्यातील १५००हून अधिक शेतकरी अवकाळी पावसाने थेट बाधित झाले असून, अनेक ठिकाणी पिके शेतातच पाण्यात बुडाली आहेत. कृषी विभागाने पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण केले असून, काही गावे अजूनही तपासणीत आहेत. अवकाळी पावसाबरोबरच वन्यप्राण्यांचा उपद्रवही वाढला आहे. डुक्कर, माकडे यांच्या हल्ल्यामुळे १५०पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी ते अजून पूर्ण झालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता, अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी शासनाकडे निवेदने सादर केली आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि वास्तववादी नुकसान भरपाई दिली जावी. काही ठिकाणी आंदोलनाची तयारीही सुरू आहे. प्रतिगुंठा १०० रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
---
चौकट
शासनाच्या भूमिकेकडे लक्ष
कोकणातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडे लहानशा जमिनीचे तुकडे, आठ ते दहा गुंठे क्षेत्र आहे. या परिस्थितीत शासनाच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया क्लिष्ट आणि अपुरी ठरत आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी फक्त एक ते दोन टक्के भरपाई मिळते, हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
---------
कोट
भातपिकासाठी साधारणपणे दहा हजार रुपये खर्च येतो आणि नुकसान भरपाई म्हणून हजार रुपयेही मिळत नाहीत, ही शेतकऱ्यांची थट्टा नाही का? शासनाने हे वास्तव लक्षात घेऊन भरपाईत विशेष वाढ करावी. तालुक्यातील शेतकरी प्रचंड नाउमेद झाला आहे.
- महेश भानसे, जावळे शेतकरी.
----------
कोट
नुकसानीबाबतीत जिल्हा तीन-चार क्रमांकावर आहे. अवकाळी पाऊस आणि वन्यप्राण्यांचा उपद्रव दोन्हींमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केवळ पंचनाम्यावर न थांबता शेतकऱ्यांना पुढील रब्बी हंगामात सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गतवर्षी रब्बी हंगामात ६० हेक्टर अतिरिक्त लागवड झाली होती, यंदा ती १०० हेक्टरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
- सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.