03095
निवडणुकांसाठी ५७ हजार २०७ मतदार निश्चित
जिल्हाधिकारी धोडमिसे ः सावंतवाडीत सर्वाधिक, एकूण ७४ मतदान केंद्रे
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले पालिका आणि कणकवली नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. चारही नगरपंचायतींसाठी ५७ हजार २०७ मतदार निश्चित आहेत. यात २७ हजार ६९७ पुरुष, तर २९ हजार ५१० स्त्री मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार सावंतवाडी पालिका क्षेत्रात १९ हजार ४२९ मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंदकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘मालवण पालिका निवडणुकीसाठी १४ हजार ३८५, वेंगुर्लेसाठी १० हजार ११५ आणि कणकवलीसाठी १३ हजार २७८ मतदार निश्चित झाले आहेत. तसेच या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ७४ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. यात सावंतवाडी २१, मालवण २०, वेंगुर्ले १६ आणि कणकवली १७ अशाप्रकारे मतदान केंद्रांचा समावेश आहे. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या तिन्ही पालिकांसाठी प्रत्येकी २० सदस्य आणि एक अध्यक्ष अशी निवड केली जाणार आहे. कणकवलीसाठी १७ सदस्य आणि आणि एक अध्यक्ष अशी निवड होईल. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या तिन्ही पालिका ‘क’ वर्गामध्ये येत असून, यांच्या सदस्य निवडणुकीसाठी अडीच लाख रुपये, तर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी साडेसात लाख रुपये उमेदवाराला खर्चमर्यादा आहे, तर कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सदस्य निवडीसाठी सव्वादोन लाख आणि नगराध्यक्ष निवडीसाठी सहा लाख खर्च मर्यादा उमेदवारांना राहणार आहे.’
जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘निवडणूक नियोजनबद्ध होण्यासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. यासाठी नियुक्त चारही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सोबत पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची बैठक झाली आहे. या निवडणूक अधिकाऱ्यांना पुरेसा कर्मचारी निवड करण्याचा अधिकार दिला आहे. राजकीय लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना आचारसंहितेबाबत माहिती देण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शस्त्रे जमा करणे, परवानगी देणे याबाबत कार्यवाही सुरू आहे. एकूणच निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज होत आहे.’
------------
जिल्ह्यात २७५ मतदार दुबार
चारही पंचायत क्षेत्रातील दुबार मतदारांचे सर्व्हेक्षण केले आहे. तसेच २७५ मतदार दुबार आढळले आहेत. एकूण ५५७ नोंदी मिळाल्या आहेत. त्यात काही तिबार नावे आढळली आहेत. आता ही यादी अद्ययावत केली आहेत. या चारही निवडणूक क्षेत्रात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. निवडणुकीला बाधा आणतील, अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत कोणाला मतदान केंद्रात प्रवेश द्यायचा, याबाबत निवडणूक आयोगाने अधिक स्पष्टता केली आहे. त्यानुसार ते निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
जिल्हा नियंत्रण, मीडिया समिती लवकरच
निवडणूक जाहीर करताना निवडणूक आयोगाने त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात आचारसंहिता लागू केली आहे. मात्र, त्याचबरोबर या निवडणूक क्षेत्रात प्रभाव पडणार नाही, अशी कृती कोणीही आजुबाजूच्या क्षेत्रात करू नये, असेही निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. लवकरच जिल्हा नियंत्रण समिती आणि मीडिया समिती स्थापन करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.
--------------
पंचायत निवडणुकीतील मतदार
नगरपालिका/नगरपंचायत*मतदान केंद्रे*पुरुष*स्त्री*इतर*एकूण
सावंतवाडी*२१*९४११*१००१८*०*१९४२९
मालवण*२०*६९८२*७४०३*०*१४३८५
वेंगुर्ले*१६*४८७१*५२४४*०*१०११५
कुडाळ*१७*६४३३*६८४५*०*१३२७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.