ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख
जाधवांसह तिघांवर गुन्हा
लोटे एमआयडीसी प्रकरण ; काते यांची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : तालुक्यातील लोटे एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी भेट घेण्यास गेलेल्या शिंदेसेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव याच्यासह सुमीत शिंदे, विवेक आंब्रे आणि काही अनोळखी व्यक्तींवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (ता. ६) दुपारी घडली. सचिन सुधीर काते (वय ४०, रा. लोटेमाळ, ता.खेड) हे गेल्या दहा वर्षांपासून लोटे एमआयडीसीमधील विविध कंपन्यांना मजूर पुरवण्याचे काम पाहतात. ६ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास स्थानिक रहिवासी सचिन कालेकर आणि रोहन कालेकर यांनी काते यांना विजय केमिकल कंपनीचे व्यवस्थापक अनंत महाडीक यांनी कामाविषयी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती दिली. त्यानुसार काते आणि त्यांच्यासोबतचे दोन सहकारी कंपनीमध्ये आले असता तेथे विक्रांत जाधव (रा. पागनाका, चिपळूण), सुमीत शिंदे (रा. दसपटी, चिपळूण), विवेक आंब्रे (रा. आवाशी, खेड) तसेच सुमारे सात ते आठ अनोळखी कामगार उपस्थित असल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
स्थानिक युवकांना रोजगार देण्याच्या मागणीवरून चर्चा सुरू झाली असताना अचानक वातावरण ताणले गेले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या वादाच्या दरम्यान विक्रांत जाधव यांनी तुम्ही स्थानिक म्हणजे काय? असा सवाल करत भांडणाला सुरुवात केली. त्यानंतर संशयितांकडून ढकलाढकली, शिवीगाळ आणि मारहाण झाली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर काते यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विक्रांत जाधव, सुमीत शिंदे, विवेक आंब्रे आणि इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
---
भगवान कोकरे महाराज,
प्रीतेश कदम यांना जामीन
खेड, ता. ७ : लोटे येथील वारकरी गुरुकुल प्रकरणातील पोक्सोअंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यातील संशयित भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रीतेश कदम यांना खेड न्यायालयाने ६ नोव्हेंबरला जामीन मंजूर केला आहे. तब्बल २६ दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर या दोघांना जामिनावर मुक्तता मिळाली आहे. या प्रकरणात १४ ऑक्टोबरला पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.