दिवाळीत लालपरीची कोटीची कमाई
खास सुटीसाठी नवीन फेऱ्या; सवलतीमुळे प्रवासी संख्येत वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : एसटीने दिवाळी सणामध्ये चांगली कमाई केली. दिवाळीनिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे सण साजरा करून मंडळी पर्यटनासाठी बाहेर पडतात शिवाय सणासाठी पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींकडे ये-जा सुरू असते. राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या प्रवाशांना विविध सवलती उपलब्ध करून दिल्याने प्रवासीसंख्येत चांगलीच वाढ झाली. परिणामी, दिवाळी सणामध्ये रत्नागिरी एसटी विभागाला १ कोटींचे उत्पन्न मिळाले.
रत्नागिरी विभागातर्फे मुंबई, पुणे, कोल्हापूर या लांब पल्ल्याच्या मार्गावर नियमित शंभर गाड्या धावत असतात. १७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत १५० नवीन जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. रत्नागिरी विभागातर्फे दिवाळीसाठी नियमित गाड्यांसह विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले होते. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे १ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. महिला प्रवाशांना तिकीटदरात पन्नास टक्के सवलत असल्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. भाऊबिजेमुळे महिला प्रवासीसंख्येत वाढ झाली होती. महामंडळाकडून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात १०० टक्के सवलत देण्यात येते. तिकिटाच्या सवलतींमुळे एसटीकडे ओढा वाढला आहे.
चौकट...
नवीन मार्गावर फेऱ्या
रत्नागिरी विभागातर्फे दिवाळी सुटीत देवदर्शन, पर्यटनासाठी काही नवीन मार्गावर सुटीमध्ये फेऱ्या सुरू केल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर, बारामती, पंढरपूर, नृहसिंहवाडी, अक्कलकोट या मार्गावर फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यासाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
चौकट...
आगारनिहाय जादा फेऱ्या
आगार* फेऱ्या
------------
दापोली* छत्रपती संभाजी नगर
चिपळूण* तुळजापूर
चिपळूण* बारामती
चिपळूण* शनीशिंगणापूर
देवरूख* स्वारगेट/पुणे
देवरूख* अक्कलकोट
रत्नागिरी* पंढरपूर
लांजा* कोल्हापूर-स्वारगेट
राजापूर* तुळजापूर
---