पावसाचा २ हजार २७७ शेतकऱ्यांना फटका
चिपळुणात ४९५.६५ हेक्टर बाधित ; दोन दिवसात पंचनामे पूर्ण होणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः अनुकूल वातावरणामुळे तालुक्यातील भातशेती यंदा चांगलीच बहरली असताना परतीच्या पावसामुळे बहरलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील १६८ गावामध्ये आतापर्यंत ४९५.६५ हेक्टरवर शेतीचे पंचमाने करण्यात आले असून, यामध्ये २ हजार २७७ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
कोकणात भातशेती हे प्रमुख पिकांपैकी एक असून, तालुक्यातील बहुतांशी शेतकरी याच लागवडीला प्राधान्य देत आले आहेत. भौगोलिकदृष्ट्या तालुका विस्तारत असून, त्यामध्ये ७ हजार हेक्टर भातशेतीचे क्षेत्र आहे. यंदा मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे पेरणीकामाचा खोळंबा झाला होता शिवाय चिखलमय शेतीत पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न भेडसावू लागला होता. असे असताना पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कशीबशी पेरणीची कामे पूर्णत्वास गेली होती. जून, जुलै महिन्यात भातलावणीदरम्यान मुबलक पाऊस व त्यानंतर शेतीस मिळालेले पोषक वातावरण यामुळे यंदा तालुक्यात भातशेती चांगलीच बहरली होती. ऑक्टोबर महिन्यात हळवे भातपीक कापणीस तयार झाले असताना काही ठिकाणी पावसाचा अंदाज घेत शेतकरीवर्गाने कापणीदेखील सुरू केली आहे. असे असताना परतीच्या पावसाने मात्र चांगलाच घोळ घातला. तालुक्यात बहरलेली भातशेती आडवी झाली शिवाय चिखलमय व साचलेल्या पाण्यावर भातशेती तरंगू लागली आहे. बहरलेल्या भातशेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत सापडला. याबरोबरच हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. या नुकसान झालेल्या भातशेतीचा आमदार शेखर निकम यांनीही आढावा घेतला आहे.
तालुक्यातील १८६ गावांमध्ये कृषी, महसूल व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पंचनामे सुरू करण्यात आले असून, ते अद्याप सुरूच आहेत. त्यानुसार ७ हजार हेक्टरपैकी ४९५.६५ हेक्टरवर जवळपास २२७७ इतक्या बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात हे पंचनामे पूर्णत्वास जाणार आहेत. या नुकसानीमध्ये भातशेतीबरोबरच नाचणी पिकांचादेखील समावेश आहे.
चौकट
भातकापणीला वेग
गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात चांगला बदल आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रखडलेल्या भातकापणीला सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीकामांनी वेग घेतला आहे.