साहित्यप्रेमींसाठी खास सांगीतिक मेजवानी
सुनीता देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमाची आज सांगता ; पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : आर्ट सर्कल आणि राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आयोजित साहित्यिक सुनीता देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमाची सांगता उद्या (ता. ९) स्वा. सावरकर नाट्यगृहात दिवसभर कार्यक्रमांच्या रेलचेलीने होणार आहे. सकाळी १०.३० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होईल. त्यानंतर लेखिका मंगला गोडबोले यांचे सुनीता देशपांडे हे मुख्य भाषण होईल. या कार्यक्रमात सुनीताबाई–पु. ल. सेवाव्रती पुरस्कार चिपळूणच्या सांजसोबत या संस्थेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
यानंतर आठवणी भाईकाकांच्या हा पु. लं. च्या आठवणींचा कार्यक्रम जयंत देशपांडे सादर करतील. पुलंच्या हजरजबाबीपणाचे असंख्य किस्से आपण वाचलेच आहेत; पण त्यातूनही पुरून उरलेले कधी कौटुंबिक आयुष्यातले किस्से त्यांच्या पुतण्याच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यानंतर लेखक प्रवीण बांदेकर बोलतील, आहे मनोहर तरी आणि बरंच काही सादर करतील. दुपारी सर्व प्रेक्षकांची भोजनाची सोय नाट्यगृहात करण्यात आली आहे. त्यानंतर संगीतकार कौशल इनामदार कवितेचे विभ्रम हा कविता आणि गाणी असा सांगीतिक कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर सुप्रसिद्ध कवी व लेखक किरण येले यांचं भाषण होईल. सायंकाळी ५ वाजता लेखक, दिग्दर्शक, अभिनेते किरण यज्ञोपवीत नाटक आणि सुनीताबाई या विषयावर बोलतील. त्यालाच जोडून पुलं काका आणि आई हा कार्यक्रम सादर करणार आहेत अभिनेत्री आणि गायिका भारती आचरेकर, सुनीता देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमाची सांगता सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी केशरी प्रहर या कार्यक्रमाने करणार आहेत. आधीच्या दोन दिवसांप्रमाणे रविवारचे कार्यक्रमदेखील सर्व रसिकांसाठी मोफत आहेत. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी सुप्रसिद्ध मुखपृष्ठकार बाळ ठाकूर यांच्या चित्रांचे आणि त्यांच्या दुर्मिळ पुस्तकांच्या खजिन्याचे प्रदर्शन मांडले आहे. त्याचाही आस्वाद रसिकांनी घ्यावा तसेच पुस्तक प्रदर्शन आणि विक्री असल्याने पुस्तकांची भरपूर खरेदी करावी, अशीही विनंती आर्ट सर्कलच्यावतीने करण्यात आली आहे.