- rat८p१०.jpg-
२५O०३१८०
चिपळूण : शहरातील गुरूकुल भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास होत आहे.
चिपळुणातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
नागरिकांची कसरत; उपनगराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून प्रवास करताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. पालिकेकडून मुख्य रस्त्यावरचे खड्डे भरले जात आहेत; मात्र उपनगरातील रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. खड्डेविरहित रस्त्यांचे येथील नागरिकांचे स्वप्न अपूर्ण आहे.
बहादूरशेख नाका येथून गुरूकुलकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच फूट अंतराचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात परतीच्या पावसाचे पाणी साचत आहे. या मार्गावरून जाणारे वाहन खड्ड्यात आदळते आणि पावसाचे पाणी रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडते. त्यामुळे नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. गुरूकुलचा परिसर हा मागील दहा वर्षात झपाट्याने विकसित झाला आहे. बहादूरशेख नाका येथील मच्छीमार्केटमधून या भागाकडे प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. तो गुरूकुल कॉलेजच्यासमोर बाहेर पडतो. बहादूरशेख चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. चौकात वाहतूककोंडी झाली तर पर्यायी रस्ता म्हणून गुरूकुलकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर केला जातो. या भागात मध्यमवर्गीयांचे बंगलो आणि गृहनिर्माण संस्था आहे. हा भाग नव्याने विकसित झाल्याने येथे कोकणातील पारंपरिक पद्धतीची जुनी घरे ठराविक आहेत. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांच्या विरंगुळासाठी येथे पालिकेने गार्डनही उभारले आहे; परंतु खराब रस्ता ही येथील नागरिकांची मुख्य समस्या आहे. येथे डोंगर उकरून काही इमारती बांधण्यात आल्या आहेत. रस्ता चांगला नसल्यामुळे तेथील सदनिका जात नव्हत्या त्यामुळे काही बिल्डरांनी मुख्य रस्त्यापासून त्या गृहसंकल्पापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटचा केला आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले होते. पावसाळा संपल्यानंतर ते खड्डे वाशिष्टी नदीतून काढण्यात आलेल्या गाळाने भरण्यात आले. यावर्षीच्या पावसाळ्यात गाळातील माती वाहून गेली आणि गोल आकाराचे बारीक दगड रस्त्यावर जमा झाले आहेत. हे दगड दुचाकींच्या अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत.
-----
कोट
गुरूकुल परिसरातील सर्व नागरिक सामूहिकरित्या रस्तेदुरुस्तीसाठी अनेकवेळा पालिकेत गेले. आम्ही गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पालिकेशी पत्रव्यवहार केला तरी रस्तेदुरुस्ती झाली नाही. अनेक वर्ष खड्डेच नशिबी आले आहेत.
- तनय कुंभार, ग्रामस्थ, चिपळूण